पनवेलच्या बारमध्ये पुण्याच्या पैशांचा पाऊस!

Dance-Bar
Dance-Bar

पनवेल - पनवेलनजीकचा कोन हा परिसर हल्ली मद्य, ‘मनी’ आणि मस्ती या त्रिकोणाचा चौथा कोन बनलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील निर्बंध हटवल्यानंतर पनवेलच्या या भागात पुन्हा एकदा बारबालांचा छमछमाट आणि पैशांचा खणखणाट सुरू झाला आहे. येथील सात बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चाललेल्या गैरप्रकारांवर रोज लाखोंची ‘उधळ’पट्टी होत असून, त्यातील बहुतांश पैसा हा पुणे आणि आजूबाजूच्या तालुक्‍यांतील ‘गुंठामंत्र्यां’चा, तेथील नवधनिक-बाळांचा असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी ४ पासूनच या ऑर्केस्ट्रा बारच्या बाहेर आलिशान गाड्यांची वर्दळ दिसू लागते. तेथे उभ्या असलेल्या दर १० गाड्यांमागे सात गाड्यांचे नंबर सुरू होतात ‘एमएच १४’ वा ‘एमएच १२’ने. हे पिंपरी-चिंचवड आणि पुणे आरटीओचे नंबर. सामाजिक अभ्यासकांच्या मते, गेल्या काही वर्षांत पुणे, पिंपरी-चिंचवड, वडगाव-मावळ ते थेट तिकडे खेड-चाकणपर्यंत ‘गुंठामंत्र्यां’चे पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणावर आलेले उद्योग आणि विकासकामे यांमुळे जमिनींना आलेला सोन्याचा भाव, गुंठ्या-गुंठ्याने जमिनी विकून अचानक आलेला पैसा यामुळे या भागातील सामाजिक चारित्र्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

एक नवी चंगळवादी संस्कृती तेथेही उदयाला आली असून, त्यातून त्यातील अनेकांची पावले डान्स बारच्या मार्गावर वळत आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पनवेल परिसरात येण्यासाठी कोन गावाजवळ फाटा आहे. पुण्याहून अवघ्या दीड-दोन तासांत तेथे पोचता येते. हा भाग मुंबई-ठाणे आणि कल्याणलाही जवळचा. परिणामी गेल्या काही वर्षांत तो ‘लेडीज सर्व्हिस’ वा ‘डान्सबार’चे केंद्रच बनला. सर्वोच्च न्यायालयातील लढाईत डान्स बारमालकांनी राज्य सरकारला मात दिल्यानंतर तेथे पुन्हा बारचा लखलखाट सुरू झाला. पुण्याहून येणाऱ्या नवधनिकांसाठी ते पुन्हा आकर्षणाचे केंद्र बनले. सायंकाळी चारपासूनच तेथे वाहनांचा राबता सुरू होतो. दिवसाला साधारणतः अडीचशे ते तीनशे कार या पुण्याच्या 
दिशेकडून येतात. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने गेल्या काही दिवसांपासून तेथे केलेल्या पाहणीतून ही वस्तुस्थिती समोर आली.

मस्ती बागायतदारपुत्रांची...  
शंकर हा वडगाव-मावळ परिसरातील एका बागायतदाराकडे कारचालक म्हणून काम करतो. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच. बहिणीचा विवाह नुकताच जमलाय. त्यासाठी तो पैशांची जुळवाजुळव करतोय. तो सांगत होता, की त्याने आपल्या मालकाकडे पैसे मागितले. पण त्याला अजून काही होकार मिळालेला नाही. शंकर सध्या त्याच चिंतेत आहे. या मालकाच्या मुलाला दारूचे व्यसन आहे. संध्याकाळ झाली की त्याला पनवेलचे वेध लागतात. त्याची आलिशान गाडी बाहेर काढण्याचा हुकूम तो शंकरला देतो. सोबत त्याचे तीन-चार मित्र असतातच. पहाटेपर्यंत ते या ऑर्केस्ट्रा बारमध्ये हजारो रुपये उडवतात. शंकर बाहेर कार पार्किंगमध्ये त्यांची वाट पाहत थांबलेला असतो. 

नियमांची मोडतोड
ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने चालणाऱ्या येथील अनेक बारमध्ये तेथील कला ही विक्रयाचीच गोष्ट असल्याचे ‘जाणकारां’कडून सांगण्यात येते. कोन परिसरातील बार मात्र तीन ते चार वाजेपर्यंत सुरू असतात. न्यायालयाच्या नियमावलीनुसार बारमध्ये पैसे उधळण्यावर बंदी आहे. मात्र ती बंदी येथे अक्षरशः उधळून लावली जाते.

एक हजाराला एक बिअर
ऑर्केस्ट्रा बारमध्ये पैसे उधळण्यातून अनेकांचे खिसे तेथे रिकामे होतात. पण या विशिष्ट बारमध्ये मद्यविक्रीतूनही ग्राहकांना लुटले जाते. तेथे एका बिअरसाठी एक हजार रुपये मोजावे लागतात. चक्क तिप्पट-चौपट दराने मद्य विकले जाते. येथे येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता हे बारमालक केवळ मद्यविक्रीतूनच महिन्याला कोट्यवधींची कमाई करतात, अशी माहिती एका बार कर्मचाऱ्याने दिली. येथे ग्राहक अगदी नागवले जातात हाच याचा अर्थ.

लेडीज बारभोवती तरुणांची वाढती गर्दी निराशाजनक आहे. राज्य सरकारने डान्स बारमध्ये सीसीटीव्ही लावण्यास परवानगी मागितली होती; मात्र राज्य सरकारची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली फेटाळली आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार

डान्स बारला आमचा सुरवातीपासून विरोध आहे. डान्स बारमुळे तरुण पिढी वाममार्गाला लागली आहे. अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. डान्स बारविरोधातील जनतेचे मत सरकारने न्यायालयापर्यंत पोचवणे गरजेचे आहे. सरकारने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरयाचिका दाखल करायला हवी.
- श्रीरंग आप्पा बारणे, खासदार

ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवण्यासाठी पहाटे दीडपर्यंत परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त जास्त वेळ ज्या ठिकाणी बार सुरू ठेवले जात असतील त्या ठिकाणी पोलिस तसेच उत्पादन शुल्क विभागातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते.
- अविनाश रणपिसे, उत्पादन शुल्क विभाग अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com