पनवेल चाचणीत नापास!

Orion-mall
Orion-mall

गुरुवार, ता. २२. वेळ : दुपारी २ ची. स्थळ : ओरियन मॉल. हे पनवेल शहरातील एक सर्वांत गजबजलेले ठिकाण. या चारमजली इमारतीत सुमारे शंभराहून अधिक दुकाने आणि सिनेमागृह आहे. अशी ठिकाणे म्हणजे दहशतवाद्यांची संभाव्य सॉफ्ट टार्गेट. म्हणूनच तेथील सुरक्षा खरेच चोख आहे का? हे पडताळण्यासाठी पनवेल शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण आणि पोलिस नाईक केशव शिंदे, विशाल आहिरे हे एका खासगी गाडीने साध्या वेशात, एखाद्या ग्राहकाप्रमाणे मॉलमध्ये गेले.

त्यांच्याकडे त्यांचे सरकारी परवाना असलेले रिव्हॉल्व्हर होते. मॉलच्या पार्किंगमध्ये जाण्यापूर्वी या गाडीची डिकी खोलून रखवालदाराकडून तपासणी करण्यात आली. गाडीत स्फोटके नसल्याची खात्री एका यंत्राद्वारे करण्यात आली. या पहिल्याच परीक्षेत तरी मॉलची सुरक्षा व्यवस्था उत्तीर्ण झाली. त्यानंतर पोलिस अधिकारी चव्हाण यांनी आपला ताफा मॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वळवला. तिथे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र दरवाजे आहेत. साध्या वेशातील पोलिस अधिकारी चव्हाण यांनी बाहेर पडण्यासाठीच्या द्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला; पण रखवालदाराने त्यांना हटकले.

त्यानंतर चव्हाण त्यांच्याजवळील रिव्हॉल्व्हर पॅन्टच्या आत खोवून जाऊ लागले. पण तेथेही त्यांना मेटल डिटेक्‍टरने पकडले. अंगझडतीत त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याचे समजताच त्यांना ते काढून प्रवेशद्वारावरील तिजोरीत जमा करायला सांगितले. चव्हाण यांनी विरोध केल्यावर मॉलच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना वॉकीटॉकीवरून पाचारण करण्यात आले. काही सेकंदातच ते आले आणि मॉल सुरक्षेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. 

यानंतर शहरातील सराफ बाजार सुरक्षित आहे का? याची खात्री करायची होती. शहरात सराफांची एकूण ८० लहान-मोठी दुकाने आहेत. पनवेलमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने येथे वामन हरी पेठे, पु. ना. गाडगीळ व पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स यांच्यासारख्या बड्या सराफांनी आपल्या पेढ्या सुरू केल्या आहेत. पोलिस अधिकारी चव्हाण व त्यांच्या पथकाने आपला मोर्चा एका मोठ्या सराफ दुकानाकडे वळवला. तेथील रखवालदाराने सहजच त्यांना प्रवेशद्वार खोलून आत येऊ दिले. त्या ज्वेलर्सने गणवेशधारी रक्षक नेमले होते; पण ते जेवायला गेले होते. अखेर काही वेळाने चव्हाण यांनी विक्रेत्यांना जवळचे रिव्हॉल्व्हर दाखवले. त्यानंतर तेथे दुकानाचे व्यवस्थापक आले. चव्हाण यांनी त्यांना आपली ओळख दिल्यानंतर त्यांनी त्याचीही खात्री करून घेतली नाही. ग्राहकांना तपासण्याची पद्धत नसल्याची सबब सांगण्यात आली. करोडो रुपयांचे सोने असलेल्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पोलिस दुकानांच्या अगदी समोर असणाऱ्या ज्वेलर्समध्ये शिरले. त्याचीही सुरक्षा वाऱ्यावर होती. नंतर चौकशीत समजले की, रखवालदाराला अवघे ६ हजार रुपये वेतन देण्यात येते. त्याला तर त्या दुकानाचे नावही सांगता येत नव्हते. पनवेल पालिकेमधील प्रशासकीय इमारत व वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह यामध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षितता आहे. नाट्यगृहामध्ये अनेक जण कंबरेला लावलेला परवानाधारक घोडा (बंदूक) घेऊन नाटक पाहत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गर्दीच्या ठिकाणी बंदूक घेऊन जाऊ नये, हा नियम पायदळी तुडवले जात आहेत. पनवेल पालिकेच्या खांद्यावर फडके नाट्यगृहाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे; मात्र स्वतः पनवेल पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची सुरक्षाही वाऱ्यावर आहे. कोणीही या टिचकी मारून जा, अशी यांची व्यवस्था आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या अभ्यागतांची अंगझडती व त्यांच्याजवळील वस्तूंची तपासणींची सोय येथे पालिकेने केलेली नाही. आयुक्त गणेश देशमुख यांच्या पदभारानंतर त्यांनी नोंदवही सुरू केली; मात्र पालिकेत स्फोटक घेऊन जाणे सहज शक्‍य होईल, अशी पोषक व्यवस्था पालिकेने केली आहे. एकंदरीत शहराने पुरेसा धडा घेतलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com