पनवेल ते गोरेगाव थेट लोकल लवकरच

संतोष मोरे
गुरुवार, 3 मे 2018

पनवेल ते गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार करण्याचा निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र ही सेवा सुरू करण्यात आधीच उशीर झाला आहे. गर्दीच्या वेळेत ही सेवा लवकर सुरू करावी. 
- संजय देशपांडे, प्रवासी. 

मुंबई : हार्बर मार्गावरून गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अंधेरी-पनवेल लोकलच्या आठ फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगावदरम्यान पहिल्या टप्प्याचा विस्तार करण्यात आला आहे. गोरेगाव ते पनवेल या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पश्‍चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातून नोकरी आणि व्यावसायानिमित्त नागरिक सानपाडा, बेलापूर, वाशी, पनवेलला रोज प्रवास करतात. या प्रवाशांनी हार्बरचा अंधेरी-पनवेल लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. 

सध्या अंधेरी ते पनवेलदरम्यान 16 फेऱ्या होतात. त्यापैकी आठ फेऱ्यांचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिल्यास गोरेगाव-पनवेल ही थेट लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे. ही सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ आणि लोकल बदलण्याच्या कटकटीपासून हजारो प्रवाशांची सुटका होणार आहे.

तसेच मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील भारही कमी होण्यास मदत होईल. आगस्टपर्यंत ही थेट लोकल सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Panvel to Goregaon direct Local recently