परमबीर सिंग यांचा 'लेटरबॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं संपूर्ण पत्र वाचा मराठीत

परमबीर सिंग यांचा 'लेटरबॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं संपूर्ण पत्र वाचा मराठीत

मुंबई, ता. 20 :  मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत स्वतःचा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करत असल्याचे म्हटले आहे. 

परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. आठ पानांच्या पत्रात त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वाझेंना पोलिस खात्यात पुन्हा घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी कोणकोणते उद्दिष्ट दिले होते आणि वाझे यांना काय करण्यास सांगितले होते, याबाबतची धक्कादायक माहिती या पत्रात त्यांनी लिहिली आहे. 

"भारताचा खरा नागरिक म्हणून मी गेली 32 वर्षे पोलिस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अंबानी स्फोटक प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले. एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कामाची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना त्याबाबत पूर्वकल्पना होती, असेही माझ्या लक्षात आले. 

सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे (सीआययू) प्रमुख म्हणून काम करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री देशमुखांनी अनेक वेळा वाझेंना त्यांच्या "ज्ञानेश्‍वरी' या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. फेब्रुवारी महिन्यातही वाझेंना त्यांच्या निवासस्थानी बोलावून देशमुखांनी ही सूचना केली. त्या वेळेस देशमुखांचे खासगी सचिव पलांडे हेही तिथे हजर होते. एवढेच नव्हे, तर 100 कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचे हेही देशमुखांनी सांगितले. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले, की मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये गोळा केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर स्रोतांकडून जमा करता येईल. 

त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या कार्यालयात आले आणि देशमुखांनी त्यांना केलेल्या मागणीबद्दल सांगितले. मला ते ऐकून धक्काच बसला. खरे तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो. काही दिवसांपूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून हुक्का पार्लरविषयी चर्चा केली. त्या बैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी बोलावण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आले. त्या वेळी पलांदे आतमध्ये होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या कक्षातून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 1750 बार-हॉटेलमधून 40-50 कोटी रुपये जमा होतील असे पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ही माहिती दिली,'' असे परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या पत्रानंतर आता मुंबई पोलिस दलातील संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे. ती माहिती वरिष्ठांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच परमबीर सिंग यांना पाचारण करून त्यांच्याकडून याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही सूत्रांनीही सांगितले. 

देशमुख यांचा भ्रष्ट कारभार पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजरेत आला होता. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. 11 व्या मुद्द्यात त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे अनेक पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे आणि पैसे गोळा करण्याच्या सूचना द्यायचे. तसेच ते पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. 

ज्या दोन अधिकाऱ्यांची नावे परमबीर सिंह यांनी पत्रात लिहिली आहेत, त्या दोन अधिकाऱ्यांचे आणि परमबीर सिंह यांचे नेमके काय संभाषण झाले ते आता समोर आलं आहे. स्वतः परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या संवादाची कॉपी जोडली आहे. 

१६ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

  • परमबीर सिंह : पाटील तू गृहमंत्री आणि पालांडे यांना फेब्रुवारीत भेटला तेंव्हा किती बार,  रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणे त्यांनी सांगितली होती 
  • परमबीर सिंह : आणि एकूण किती पैसे जमा करायला सांगितले होते. 
  • परमबीर सिंह : जरा पटकन...
  • ACP पाटील : मुंबईतील १ हजार ७५० बार्स, रेस्टॉरंट्स आणि इतर काही बाबी. प्रत्येकी ३ लाख रुपये
  • ACP पाटील :  महिन्याकाठी एकूण ५० कोटी जमा झाले पाहिजेत
  • परमबीर सिंह : आणि वाझे भेटलेले ती तारीख काय होती 
  • ACP पाटील :  सर मला तारीख नक्की आठवत नाही 
  • परमबीर सिंह : तुम्ही म्हणालात तुमच्या भेटीआधी काही दिवस 
  • ACP पाटील : हो सर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 

१९ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

  • परमबीर सिंह : पाटील मला आणखी काही माहिती हवी आहे 
  • परमबीर सिंह : गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर तुला वाझे भेटले होते का ? 
  • ACP पाटील :  हो सर गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझे मला भेटले होते
  • परमबीर सिंह : गृहमंत्र्यांनी का बोलावलं, ते तुला सांगितलं का ? 
  • ACP पाटील :  त्यांनी मला सांगितलं भेटीचे कारण, १ हजार ७५० ठिकाणांहून ३ लाख रुपयांप्रमाणे महिन्याकाठी ४० ते ५० कोटी जमा करायला सांगितले होते. 
  • परमबीर सिंह : अरे ! हे तुला जे सांगितलं तेच त्याला देखील सांगितलं 
  • ACP पाटील :  चार मार्चला त्यांचा सहाय्य्क पलांडे यांनीही मला हेच सांगितलं
  • परमबीर सिंह : म्हणजे पलांडे यांना तू ४ मार्चला भेटलास 
  • ACP पाटील :  हो सर मला बोलावलं होतं 


डेलकर प्रकरणावरही भाष्य 

मोहन डेलकर यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची चौकशी दादरा, नगर-हवेली पोलिसांनी करायला हवी. कारण त्यांनी आत्महत्या जरी मुंबईत केली असली, तरी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या घटना दादरा, नगर-हवेली येथे घडल्या. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर मी हे मत व्यक्त केले; मात्र त्यावर अनिल देशमुखांनी मुंबईतच आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला आणि परस्पर याप्रकरणी एसआयटीची विधानसभेत घोषणा केल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. 

देशमुखांनी आरोप फेटाळले 

दरम्यान, याप्रकरणी अनिल देशमुख यांनी ट्विट करून हे आरोप फेटाळले. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्‍यता होती. त्यामुळे परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचे ट्विट देशमुख यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com