esakal | परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

बोलून बातमी शोधा

Parambir-Singh-Letter

याचिकेतील मुद्दे बघता 'कॅट'मध्ये सुनावणी गरजेची असल्याचं नोंदवलं मत

परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी प्राथमिक चौकशी विरोधात केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. याचिकेतील मुद्दे बघता यावर कॅटमध्ये (Central Administrative Tribunal (CAT) सुनावणी व्हायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. राज्य सरकारने सिंह यांच्या विरोधात दोन स्वतंत्र आदेशामार्फत पोलीस महासंचालक संजय पांडे यांना प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात सिंह यांनी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर आज न्या. एस एस शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पांडे यांनी चौकशी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सिंह यांनी केलेली याचिका अप्रस्तुत ठरली आहे, असे सरकारकडून एड दरायस खंबाटा यांनी सांगितले. (Param Bir Singh plea challenging PEs can be decided by CAT Says Bombay High Court)

हेही वाचा: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची NIA कडून सुरु आहे चौकशी

आता सरकार नव्याने चौकशी करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पांडे यांच्या वतीने एड सिरवई यांनी बाजू मांडली. सिंह यांनी केलेले आरोप पांडे यांना अमान्य आहेत, मात्र आता ते यामध्ये चौकशी करणार नाही, असे एड नवरोज सिरवई म्हणाले. संबंधित प्रकरण सेवा नियमांवर आहे, यावर केंद्रीय प्रशासकीय आयोगापुढे सिंह यांनी दाद मागायला हवी, त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळावी, असेही खंबाटा आणि सिरवई यांनी खंडपीठापुढे मांडले. याचिकेत उपस्थित मुद्यांवरुन संबंधित प्रकरणे सेवानियुक्तीसंबंधित आहेत, त्यामुळे यावर नियमानुसार कैटमध्ये सुनावणी व्हायला हवी, असे प्रथमदर्शनी दिसते असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

हेही वाचा: परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या; बुकींनी केले आरोप

आजच्या सुनावणीला सिंह यांच्या वतीने एड मुकुल रोहतगी आणि आबाद पोंडा हजर राहू शकले नाही, म्हणून येत्या गुरुवारी सुनावणी घ्यावी, असे सिंह यांच्या वतीने सनी पुनामिया यांनी विनंती केली. वकिलांनी केलेल्या विनंतीमुळे सुनावणी तहकूब करत आहे. मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे काही नाही, याचिका प्रलंबित असताना सिंह कैटमध्ये दाद मागू शकतात, असे नोंदवित खंडपीठाने सुनावणी ता 9 जूनला तहकूब केली. सरकारने ता 1 आणि 20 एप्रिल रोजी सिंह यांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. सेवानियुक्ती संबंधित प्रकरणांबाबत ही चौकशी आहे. मात्र माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून माझ्यावर वेगवेगळ्या चौकशा आणि गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप सिंह यांनी याचिकेत केला आहे. सिंह यांनी पत्राद्वारे देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप केले आहेत. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

(संपादन- विराज भागवत)