esakal | परमबीर सिंह यांच्याकडून पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका दाखल

बोलून बातमी शोधा

parambir singh
परमबीर सिंह यांच्याकडून पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका दाखल
sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. राज्य सरकारने सिंह यांच्या विरोधात सुरू केलेल्या दोन प्राथमिक चौकशीविरोधात ही याचिका केली आहे. माजी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून मला लक्ष्य केले जात आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप जाहीर पत्राद्वारे लावले आहेत. या पत्राची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. मात्र आता या कारणावरुन सरकार मला लक्ष्य करत असून माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावत आहे, असा आरोप सिंह यांनी केला आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी 19 तारखेला मला ते पत्र मागे घेण्याचा इशारा दिला होता. जर पत्र मागे घेतले तर तक्रारीमध्ये तथ्य राहणार नाही. तुम्ही यंत्रणेबरोबर लढू शकणार नाही. अन्यथा तुमच्या विरोधात चौकशी सुरू होतील. असा खळबळजनक दावा सिंह यांनी केला आहे. या बैठकीचे रेकॉर्डिंग सीबीआयला दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: लसीकरण तीन दिवस बंद, केंद्रावर गर्दी करु नये; पालिकेचं आवाहन

न्या एस एस शिंदे आणि न्या मिलिंद पितळे यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी यावर सुनावणी झाली. सिंह यांच्या वय ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. सरकारनं 1 आणि 20 दोन स्वतंत्र आदेश देऊन सिंह यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश पांडे यांना दिले आहेत. पोलिस सेवा नियमांबाबत हे प्रकरण आहे, देशमुख यांच्या विरोधात आरोप केले म्हणून त्यांना लक्ष्य केले जाते आहे असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला.

सरकारी वकील दिपक ठाकरे यांनी याचिकेवर बाजू मांडण्यासाठी अवधी मागितला. यावर सरकार खुलासा करेपर्यंत चौकशीवर तूर्तास स्थगिती द्यावी अशी मागणी रोहतगी यांनी केली. पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने केला. यावर नाही असे उत्तर रोहतगी यांनी दिले. मग एवढी घाई कशाला, सरकारला याचिकेवर खुलासा करु द्या, हे फार तर सर्व्हिस प्रकरण आहे, असे खंडपीठ म्हणाले. राज्य सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले.

हेही वाचा: मोठी बातमी: आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

अकोलामध्येही गुरुवारी एक फिर्याद सिंह यांच्या विरोधात दाखल झाली आहे. या फिर्यादीला देखील आम्ही आव्हान देत आहे असे रोहतगी म्हणाले. मात्र अकोला नागपूर खंडपीठात येते, त्यामुळे तिथे याचिका करावी लागेल, असे खंडपीठ म्हणाले. या याचिकेवर पुढील सुनावणी 4 मे रोजी आहे.

सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप ठेवले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला हॉटेल आणि बारमार्फत खंडणी वसूल करायला सांगितले होते, असा आरोप केला आहे. देशमुख यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

(संपादन- पूजा विचारे)

parambir singh once again files petition bombay high court