परिवर्तन आणि सेवक फाउंडेशनची सामाजिक बांधिलकीची नवी सुरवात

संजीत वायंगणकर
सोमवार, 19 मार्च 2018

गुढीपाडवा म्हणजे नवीनवर्ष, उत्साह आणि आनंदाचे वातावरण आणि याचं दिवशी समाजातील दुर्लक्षित आदिवासी परिसरात कपडे वाटपासाठी टीम परिवर्तन आणि सेवक फाउंडेशनच्या युवकांनी पुढाकार घेतला.

डोंबिवली - जल्लोषात निघणाऱ्या स्वागत यात्रेत सहभागी होऊन केवळ संदेश न देता डोंबिवलीच्या युवावर्गाने कृतीतून समाजसेवेचे उदाहरण देत नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. गुढीपाडव्या निमित्ताने आदिवासी भागात कपडे आणि सायकल वाटप करुन टीम परिवर्तन आणि सेवक फाउंडेशनच्या युवा सदस्यांनी समाज बांधिलकी मानून समाजाचं देणं फेडत नववर्षाची सुरवात केली.

गुढीपाडवा म्हणजे नवीनवर्ष, उत्साह आणि आनंदाचे वातावरण आणि याचं दिवशी समाजातील दुर्लक्षित आदिवासी परिसरात कपडे वाटपासाठी टीम परिवर्तन आणि सेवक फाउंडेशनच्या युवकांनी पुढाकार घेतला. नागरिकांना करण्यात आलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि कल्याण, ठाणे, मुंबई शहर परिसरात या मोहिमेअंतर्गत युवकांनी कपडे संकलन केले. जमलेले कपडे गुढीपाडव्याच्या निमित्ताने टिटवळा येथील खोणाची वाडी आणि म्हस्कळ वाडी येथे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर याचं परिसरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलीला शाळेचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी यावेळीं सायकल देखील देण्यात आली. टीम परिवर्तन आणि सेवक फाऊंडेशन प्रामुख्याने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या आणि शिक्षण घेत असलेल्या युवकांचा समुह आहे. कपडे व पुस्तके संकलन आणि पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी हे युवा सदस्य काम करत आहेत. येत्या काळांत शैक्षणिक साहित्य आणि गरजु विदयार्थ्यांना सायकली देण्यासाठीही काम करणार व नागरिकांना या मोहिमेला जोडून घेण्याचे काम टीम परिवर्तन आणि सेवक फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवली पश्चिमेकडील नवयुवक मित्र मंडळाच्या सदस्यांनीही जव्हार येथील खडखड या आदिवासी पाड्यात कपडे, जीवनावश्यक वस्तू, खाऊ व खेळणी यांचे सलग तिसऱ्या वर्षी वाटप करुन नवीन वर्षाची सुरवात केली. 

Web Title: parivartan and sevak foundation cloth donation aadivasi people