इमारतीचा भाग कोसळला

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कळंबोलीतील घटना; जीवितहानी टळली 

नवीन पनवेल : कळंबोली येथील करावली चौकजवळील सेक्‍टर ३ येथील जीर्ण झालेल्या रिधिमा सोसायटीचा मागील भाग गुरुवारी (ता.८) सकाळी साडे अकराच्या सुमारास कोसळला. यात  कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. इमारत जीर्ण झालेली असल्यामुळे इमारत कुठल्याही क्षणी कोसळू शकते. त्यामुळे रिधिमा इमारतीच्या बाजूच्या तीन सोसायट्यांमधील नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.

कळंबोलीमधील रिधिमा ही सहा मजली इमारत १९९२ साली बांधण्यात आली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे २००७ साली पंधरा वर्षातच सिडकोने इमारत धोकादायक म्हणून घोषित केली. या इमारतीतमध्ये एकूण २२ सदनिका आहेत. सिडकोने नोटीस दिल्यानंतर एक-एक करत २०११ पर्यत रिधिमा इमारतीमधील सर्व कुटुंबे स्थलांतरित झाली. बुधवारी (ता. ७) रात्री रिधिमा इमारतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर बाजूच्या इमारतीमधील लोकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास इमारतीचा मागील भाग संपूर्ण कोसळला. सिडकोने ही इमारत धोकादायक असल्याचे ठरवूनही आजपर्यंत पंधरा वर्षांमध्ये इमारत पाडण्यात आली नाही; मात्र लवकरात लवकर इमारत पाडावी, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या घटनेनंतर बाजूच्या इमारतीमधील लोकांना पालिका व पोलिस प्रशासनाने तत्काळ स्थलांतरित केले.  

कळंबोली पोलिस व सिडको अग्निशमन विभागास तातडीने कळवून परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सदरचा भाग निर्मनुष्य करण्यात आला. इमारत तातडीने निष्कासन करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. लवकरच इमारत निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
- जमिर लेंगरेकर, उपायुक्त, पालिका 

२००७ साली सिडकोच्या अग्निशमन विभागाने ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित केल्यानंतर २०११ पर्यंत रहिवाशांनीही इमारत रिकामी केली. तेव्हापासून इमारत पाडण्यासाठी व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करत आहोत;परंतु सिडकोने ही इमारत पाडण्यासाठी परवानगी दिली नाही.
- के. एन. सिंग, सचिव, रिधिमा सोसायटी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part of the building collapsed