प्रवाशांच्या जीवाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नवी मुंबई - नवी मुंबईत बेकायदा प्रवासी वाहतुकीचे पेव फुटले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी रिक्षा आणि खासगी वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न तर निर्माण झाला आहेच; शिवाय यामुळे एनएमएमटीच्या बस रिकाम्या धावत असल्याने तोटा होत आहे. या बेकायदा प्रवासी वाहतुकीकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांचे फावले आहे.

जुईनगर रेल्वेस्थानकातून जेएनपीटी, उरण या मार्गावर रिक्षा आणि खासगी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. येथे सहा आसनी रिक्षात आठ ते दहा प्रवासी भरले जातात. सहा ते सात प्रवासी क्षमतेच्या खासगी वाहनात दहा-अकरा प्रवासी कोंबून वाहतूक सुरू असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. जुईनगर येथून निघाल्यावर किल्ले गावठाण आणि पुढे गव्हाणपाडा टाकी गाव, जेएनपीटी असे या बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे थांबे ठरलेले आहेत. नेरूळ आणि बेलापूर रेल्वेस्थानकातूनही जेएनपीटीसाठी खासगी बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. तुर्भे नाका ते पनवेल, बेलापूर हायवे ते कळंबोली आणि पनवेल या मार्गांवरही अशाप्रकारे बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. 

यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला असता बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई केली जाते. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तेथे ते दोन हजार ५०० रुपये दंड भरतात. तेथून सुटल्यावर ते पुन्हा बेकायदा प्रवासी वाहतूक करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय नसल्याने प्रवासी या बेकायदा प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सेवेत सुधारणा करण्याची सूचना नवी मुंबईचे पालिका आयुक्त रामास्वामी यांनी नुकतीच एनएमएमटीला केली होती.

तक्रारीला  केराची टोपली
बेकायदा प्रवासी वाहतुकीमुळे एनएमएमटी आणि बेस्टच्या प्रवासी संख्येत घट होत असल्यामुळे या उपक्रमांना तोटा होत आहे. यामुळे एनएमएमटीचे १० ते १५ टक्के उत्पन्न घटले आहे. त्यामुळे एनएमएमटीच्या व्यवस्थापनाने वाहतूक पोलिस आणि परिवहन उपायुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे; परंतु त्याची त्यांनी दखल घेतलेली नाही.

Web Title: passenger life issue