esakal | प्रवाशी म्हणतायेत, एसी लोकल नको रे बाबा..!
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशी म्हणतायेत, एसी लोकल नको रे बाबा..!

ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या एसी (वातानुकूलित) लोकलचा फज्जा फडाला आहे. लोकल सुरू होऊन दोन दिवसही उलटत नाहीत, तोच प्रवाशांनी एसी सेवेकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रवाशी म्हणतायेत, एसी लोकल नको रे बाबा..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या एसी (वातानुकूलित) लोकलचा फज्जा फडाला आहे. लोकल सुरू होऊन दोन दिवसही उलटत नाहीत, तोच प्रवाशांनी एसी सेवेकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. पनवेल रेल्वेस्थानकातून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या एसी लोकल भर गर्दीच्या वेळेतही रिकाम्या धावत आहेत. विशेष म्हणजे साधारण लोकल सेवा रद्द करून, त्याऐवजी मध्य रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांचा समावेश केल्यामुळे प्रवासीवर्गातून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.

ही बातमी वाचली का? नगसेवक म्हणतात, कार्यकर्त्यांनो यावेळी उमेदवारी तुम्हाला.. 

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाआधी रेल्वे प्रशासनाने पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकल चालवली आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकलची सेवा सुरू करण्याचा निर्णय अलीकडच्या काळात घेतला. त्यानुसार शुक्रवारी (ता.31) सकाळी पहिल्या एसी लोकलला पनवेल रेल्वेस्थानकातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्याच वेळी पहिली एसी लोकल असल्यामुळे उत्सुकतेपोटी काही प्रवाशांनी तिकीट खरेदी केली होती. मात्र, तिकीट दर खूपच महाग असल्याची ओरड प्रवाशांकडून झाली. शनिवार आणि रविवार हे आठवडाअखेरचे सुट्टीचे दिवस असल्यामुळे या एसी लोकलला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात येत नव्हता. मात्र, 3 फेब्रुवारीचा आठवड्याचा पहिला सोमवार (ता.3) व मंगळवारी (ता.4) या दोन्ही कार्यालयीन दिवशी ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व एसी लोकल रिकाम्या धावत असल्याचे पाहायला मिळाले. 

ही बातमी वाचली का? दिवसा टेहळणी आणि रात्री घरफोडी

प्रवाशांना गर्दीचा भुर्दंड 
रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावरील 16 फेऱ्या रद्द करून, त्याऐवजी एसी लोकल सेवा सुरू केल्यामुळे ज्या प्रवाशांना एसीने प्रवास करायचा नाही. अशा प्रवाशांना गर्दीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. पनवेल रेल्वेस्थानकातून पहिली एसी लोकल पहाटे 5 वाजून 44 मिनिटांनी सुटते; तर ठाणे रेल्वेस्थानकातून नेरूळला जाणारी पहिली एसी लोकल 6.46 ला सुटते. याव्यतिरिक्त कार्यालयात जाण्यासाठी व कार्यालयातून घरी जाण्यासाठी 7.29 नंतरच्या ठाणे, वाशी, नेरूळ व पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गर्दीच्या वेळेतील लोकलही रिकाम्या जात आहेत. 

ही बातमी वाचली का? केंद्राच्या धर्तीवर राज्यातही पाच दिवसांचा आठवडा सुरू

महागडे तिकीट 
एसी लोकलचे पहिल्या सहा किलोमीटर अंतरावरील रेल्वेस्थानकासाठी कमीत कमी 70 रुपये दर आकारण्यात आला आहे. तोच साधारण लोकलचा दर पहिल्या सहा किलो मीटरसाठी 5 ते 7 रुपये आकारला आहे. पनवेल ते ठाणे या अंतरावर साध्या रेल्वेने द्वितीय श्रेणीत प्रवास केल्यास 15 रुपये तिकीट खर्च येतो. याच मार्गावर एसी लोकलचा दर 175 रुपये एवढा पडतो. 

प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा सुरू केली. सुरुवातीला या लोकलचे दर प्रवाशांना महागडे वाटतील. मात्र सेवेचा लाभ घेतल्यानंतर हळूहळू प्रतिसाद मिळेल. 
- अनिल जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

loading image