सानपाडा स्थानकात प्रवाशाला लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

लोकलची वाट पाहत रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपी गेलेल्या तरुणाच्या खिशातील मोबाईल फोनसह सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा सुमारे ७५ हजारांचा किमती ऐवज दोघा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सानपाडा रेल्वे स्थानकात घडली.

नवी मुंबई : लोकलची वाट पाहत रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपी गेलेल्या तरुणाच्या खिशातील मोबाईल फोनसह सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा सुमारे ७५ हजारांचा किमती ऐवज दोघा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सानपाडा रेल्वे स्थानकात घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून, त्यांचा शोध सुरू केला आहे. 

तक्रारदार तरुणाचे नाव विपुल विजय सिंग (२५) असे असून, तो घणसोली गावातील चिंचआळी भागात राहावयास आहे. सानपाडा रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत बसला; मात्र यावेळी त्याला झोप आल्याने तो तेथील बाकड्यावर झोपी गेला. हीच संधी साधून दोघा चोरट्यांनी झोपी गेलेल्या विपुलच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच ६० हजार रुपये किमतीची सोन्याची ब्रेसलेट त्याचप्रमाणे ४५०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यामुळे विपुलला जाग आल्यानंतर त्याने आरडाओरड करत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत केला; मात्र तोपर्यंत दोघा चोरट्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. त्यामुळे विपुलने वाशी रेल्वे पोलिस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The passenger was robbed at Sanpada station