डोंबिवलीत पोस्ट ऑफिसमध्ये सुरु होणार पासपोर्ट कार्यालय

सुचिता करमरकर
मंगळवार, 27 जून 2017

ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने होणारे नागरिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने डोंबिवलीमध्ये पोस्ट ऑफीस कार्यालयातच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एका पत्राद्वारे येथील वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

कल्याण - ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने होणारे नागरिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने डोंबिवलीमध्ये पोस्ट ऑफीस कार्यालयातच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एका पत्राद्वारे येथील वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

पासपोर्टसाठी जिल्ह्याला सध्या एकच कार्यालय आहे. लाखो नागरिकांची गैरसोय पाहून कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या संबंधी पाठपुरावा केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यावर प्रतिसाद देत डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येईल, असे पत्राद्वारे कळवले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा चार ठिकाणी पासपोर्ट कार्यालये आहेत. ठाण्याअंतर्गत मुंबईवगळता एमएमआर प्रदेश, नवी मुंबई, रायगड, तसेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्राएवढा मोठा परिसर येत असल्याने ठाणे कार्यालयावर कामाचा ताण आहे. त्यातच ठाणे कार्यालयाअंतर्गत सध्या केवळ तीनच पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत असून त्यापैकी ठाणे, मुंबई आणि नाशिक येथे प्रत्येकी एकच कार्यालय आहे. त्यामुळे ठाण्यापुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातील लाखो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.

पासपोर्ट सेवा केंद्राच्या कमतरतेमुळे तसेच ठाण्याच्या सेवा केंद्रावर असलेल्या ताणामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या अंदाजे बावीस लाखांपेक्षा अधिक आहे. येथे तीन महानगरपालिका, एक नगरपालिका आणि 75 हून अधिक गावे असल्याचेही खासदार शिंदे यांनी स्वराज यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांच्या पत्राची तातडीने दखल घेऊन स्वराज यांनी डोंबिवली येथे पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार नजीकच्या काळात डोंबिवलीतील पोस्ट कार्यालयाची पाहणी करुन ही सेवा सुरु करण्यात येईल.

Web Title: passport office dombiwali news mumbai news marathi news