पाताळगंगेने घेतला मोकळा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

रसायानीतील इसांबे, वडगाव, चांभार्ली, वासांबे-मोहोपाडा, वावेघर, कराडे खुर्द, गुळसुंदे, चावणे, आपटे आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावाजवळून पाताळगंगा नदी वाहत जात आहे. नदीत मासेमारी करून अनेकांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे; मात्र नदीत जलपर्णी वाढली की, मासेमारी करताना अडथळा निर्माण होत असल्याचे मासेमारी करणाऱ्यांनी सांगितले.

मुंबई ः रसायनी परिसरात शनिवारी संततधारेमुळे पाताळगंगा नदीला पूर आला होता. या पाण्याबरोबर नदीतील जलपर्णी आणि इतर कचरा वाहून गेला असल्याने पाताळगंगा नदीने सध्या मोकळा श्‍वास घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

परिसरातील बहुतेक गावांची लोकसंख्या कारखानदारीमुळे वाढली आहे. त्यामुळे नागरी वस्तीमधून नदीत सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. काही कारखानदार चोरून प्रदूषित सांडपाणी सोडत आहेत. त्यामुळे साधारण पाच वर्षांपासून नदीत जलपर्णी वाढू लागली आहे, असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने पाताळगंगा नदीत ठिकठिकाणी जलपर्णी लवकरच वाढली होती. त्यामुळे नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते.

रसायानीतील इसांबे, वडगाव, चांभार्ली, वासांबे-मोहोपाडा, वावेघर, कराडे खुर्द, गुळसुंदे, चावणे, आपटे आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावाजवळून पाताळगंगा नदी वाहत जात आहे. नदीत मासेमारी करून अनेकांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे; मात्र नदीत जलपर्णी वाढली की, मासेमारी करताना अडथळा निर्माण होत असल्याचे मासेमारी करणाऱ्यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी पाताळगंगा नदीत जलपर्णी वाढली होती; मात्र त्यानंतर दोन वर्षे पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. महापुराच्या पाण्याबरोबर जलपर्णी आणि नदीतील इतर कचरा वाहून गेला. त्यामुळे दोन वर्षे जलपर्णींचे नदीत प्रमाण कमी होते. मागील वर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे नदीत ठिकठिकाणी भरपूर जलपर्णी वाढली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना पाण्याचा वापर करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, असे विनायक भोईर यांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला आहे. शुक्रवारच्या महापुराच्या पाण्याबरोबर नदीतील जलपर्णी आणि इतर कचरा वाहून गेला. त्यामुळे यंदाच्या वर्षी नदीतील जलपर्णी वाढीचे प्रमाण घटेल, अशी शक्‍यता जाणकार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patalganga