मुंबईत रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल; नातेवाईकांनाच शोधावे लागताहेत रक्तदाते 

भाग्यश्री भुवड
Sunday, 18 October 2020

कोरोनामुळे रक्तदानाच्या शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईतील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

मुंबई : कोरोनामुळे रक्तदानाच्या शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईतील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग असणाऱ्या आजारांच्या रुग्णांच्या कुटुंबीयांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे. 

गोयल मुंबईद्रोही असल्याचा भाकपचा आरोप; महिलांना लोकल प्रवास नाकारल्याने गंभीर प्रतिक्रिया

मुंबईत दोन हजार थॅलेसेमिया रुग्ण असून रुग्णांना महिन्याला त्यांचे वय आणि वजनानुसार जवळपास 9 हजार लाल रक्तपेशींच्या पिशव्यांची गरज लागते. यातील काही मुलांना 15 दिवसांतून एकदा रक्त लागते; तर ज्यांचे वजन आणि वय जास्त असते त्यांना 21 दिवसांतून दोन ते तीन पिशवीची गरज भासते; मात्र दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान भरवल्या गेलेल्या रक्तदान शिबिरांमुळे मुंबईतील रक्ताचा तुटवडा तात्पुरता पुढे ढकलला गेला; मात्र त्यानंतर आता पुन्हा मुंबईत रक्ताची चणचण भासू लागली आहे. 

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नुकतेच जे. जे. महानगर रक्तपेढीने भरवलेल्या रक्तदान शिबिरात केवळ 25 दात्यांनी सहभाग घेतला; तर दोन दिवसांपूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालयातर्फे भरवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात केवळ 15 दात्यांनी पुढाकार घेतला. 
सध्या केवळ रुग्णांचे नातेवाईकच नव्हे, तर रक्तपेढ्यांकडूनही रक्ताची मागणी करणारे जवळपास 25 ते 30 फोन येतात. राज्यातही रक्तसंकलनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नवरात्रीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तकेंद्र प्रमुखांना दिल्या आहेत. निवासी संकुलांनी पुढाकार घेत संकुलाच्या आवारातच रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास मोठ्या प्रमाणात रक्त उपलब्ध होऊ शकेल आणि दातेही पुढे येतील, असे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सूचित केले आहे. 

भारताची ऐश्‍वर्या श्रीधर "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' 

रक्ताचा सध्याचा साठा (युनिटमध्ये- 17 ऑक्‍टोबरपर्यंत) 
केईएम- 56, सेंट जॉर्ज- 1, जे. जे.- 45, कूपर- 13, जीटी- 10, रेड क्रॉस- 1, भाभा- 15, नायर- 70, सायन- 52, राजवाडी- 2, कामा- 42, जे.जे. महानगर- 56, सेव्हन हिल्स- 7, कांदिवली- 1, जगजीवनराम- 2 युनिट

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients condition due to blood shortage in Mumbai Relatives have to find blood donors