पालिका रुग्णालयात सफाई कामगारांकडून रुग्णांची मलमपट्टी

सफाई कामगारांकडून रुग्णांची पालिका रुग्णालयात मलमपट्टी
सफाई कामगारांकडून रुग्णांची पालिका रुग्णालयात मलमपट्टी

मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्‍टर ३ मध्ये पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून माता-बाल रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, रुग्णालयात व्रणोपचारतज्ज्ञ नसल्याने जखमेची ड्रेसिंग खुद्द सफाई कामगारांना करावी लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

ऐरोली येथे मनपाचे जिजामाता भोसले सार्वजनिक रुग्णालय आहे. या रुग्णालयात कमीत कमी १०० रुग्ण उपचार घेऊ शकतात. मात्र, हे रुग्णालय सुरू होऊन पाच वर्षे झाली तरीही हा दवाखाना माता-बाल रुग्णालयाच्या बाहेर गेला नसल्याचे दिघा येथील चार वर्षीय निधी बासूतकरवर केलेल्या उपचारावरून दिसत आहे. 

निधी बासूतकर ही दोन दिवसांपूर्वी आपला मामाच्या घरी उल्हासनगर येथे गेली होती. परंतु शिडीवर चढत असताना तिचा तोल गेला व ती खाली पडली. त्यामुळे तिच्या कपाळावर मार लागल्याने मोठी जखम झाली व तिच्या कपाळावर सात टाके घालण्यात आले. सोमवारी (ता.२९) सकाळी १० च्या सुमारास ऐरोली येथील मनपाच्या रुग्णालयात जखमेवरील पट्टी बदलणे व औषधोपचार करण्यासाठी तिला या रुग्णालात नेण्यात आले होते; परंतु जखमेवरील पट्टी बदलण्यासाठी व्रणोपचारतज्ज्ञांची गरज असते. ते जर नसतील तर नर्स किंवा ब्रदरने ते काम करणे गरजेचे असते. परंतु, ऐरोली येथील रुग्णालयात एका सफाई कामगाराने निधी बासूतकरची पट्टी बदलण्याचे काम केले व औषधोपचार केले. त्यामुळे निधीचे वडील गणेश बासूतकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जखम स्वच्छ करत असताना संबंधितांनी हातमोजे, मास्क लावणे अत्यावश्‍यक आहे; परंतु माझ्या मुलीची जखम स्वच्छ करताना सफाई कामगारांनी कोणतीही साधने वापरली नव्हती. जर माझ्या मुलीच्या जखमेत इन्फेक्‍शन झाले, तर याला जबाबदार कोण?
- गणेश बासूतकर, रुग्ण निधीचे वडील.

सफाई कामगारांकडून मलमपट्टी करणे चुकीचे आहे. व्रणोपचारतज्ज्ञ नसेल तर सिस्टर व ब्रदरने मलमपट्टी करणे गरजेचे आहे.
- दयानंद कटके, मुख्य स्वच्छता अधिकारी, पालिका.

सदरील प्रकार चुकीचा असून याबाबत आपण चौकशी करणार असून, इतर रुग्णालयात डॉक्‍टर किंवा सिस्टर ड्रेसिंग करतात; मात्र इथला प्रकार खूपच चुकीचा आहे
-वैशाली नाईक, आरोग्य समिती सभापती, पालिका

याबाबत आपण रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार. सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेसिंग करण्यास सांगणे कितपत योग्य आहे. तसेच मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले जाईल.पालिका रुग्णालयात नेहमी काहींना काही नवीन घडामोडी होत असतात
-नीलेश बाणखेले, 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com