रुग्णालयांतील सेवेवर 61 टक्के रुग्ण नाराज!

doctors
doctors

मुंबई : एकीकडे वैद्यकीय सेवा सर्वसामान्य रुग्णांच्या आर्थिक आवाक्‍याबाहेर चाललेली असतानाच, दुसरीकडे रुग्णालयांतून दिली जाणारी सेवाही सुमार दर्जाची असल्याचे वास्तव समोर आले. "फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री' (फिक्की) या उद्योजक आणि व्यावसायिकांच्या शीर्षस्थ संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. या सर्वेक्षणानुसार देशभरातील 61 टक्के रुग्णांनी रुग्णालयांतील सेवेचा दर्जा निकृष्ट असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

2016 मध्ये 37 टक्के रुग्णांनी रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा सुमार असल्याची तक्रार नोंदवली होती. फिक्कीने देशातील विविध राज्यांतील एक हजार रुग्णांचे ऑनलाईन सर्वेक्षण केले. त्यानुसार अशी तक्रार करणा-यांच्या प्रमाणात 24 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. रुग्णालयांत वेळेवर प्रतिसाद न मिळणे, प्रतीक्षायादी, रुग्णांकडून उपचारांबाबतची माहिती न घेणे अशा विविध गोष्टींबाबत रुग्णांच्या तक्रारी आहेत. 

खासगी व सरकारी दोन्ही क्षेत्रातील रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी खासगी रुग्णालयांनीही प्रयत्न करावा, सेवा चांगली ठेवण्यासाठी प्रसंगी किंमत वाढवावी, असा सल्लाही या अहवाल देण्यात आला आहे. 
देशातील 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागांत राहते. खासकरुन तेथे वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारण्याची आवश्‍यकता असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. ग्रामीण भागांत खासगी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध करणे, "मेक इन इंडिया'च्या माध्यमातून पुरेसा औषध पुरवठा आदी उपाययोजना या अहवालात सुचवण्यात आल्या आहेत. 

रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी 
रुग्णांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, रुग्णसेवेची कार्यक्षमता, सबलीकरण आणि सुलभतेकडे लक्ष द्यावे, तसेच या सोयींची पूर्तता करण्यासाठी आवश्‍यक वातावरणनिर्मिती या पंचसूत्रीवर रुग्णालयांनी लक्ष द्यावे.

रुग्णांच्या तक्रारींकडे खासगी रुग्णालय प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवे. प्रवेशापासून, उपचारापर्यंत रुग्णाला व्यवस्थित सेवा मिळत असल्याची खातरजमा करावी. कित्येकदा मोठा आजार असल्याने जास्त काळ रुग्णालयात राहावे लागल्यानेही रुग्णांच्या तक्रारी येत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. 
- डॉ भरत शाह, संचालक, ग्लोबल रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com