बाजारपेठ उघडताच मोबाईलच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी; सुटे भाग नसल्यामुळे व्यापारी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

मुंबईतील बाजारपेठा उघडल्यानंतर आज मोबाईल दुरुस्तीची छोटी दुकाने किंवा टपऱ्यांमध्ये लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र होलसेल मार्केटमध्ये अजूनही मोबाईल दुरुस्ती चे साहित्य परदेशातून येत असल्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे दोन-तीन आठवड्यानंतर कळेल असे एकंदर चित्र आहे.

मुंबई: मुंबईतील बाजारपेठा उघडल्यानंतर आज मोबाईल दुरुस्तीची छोटी दुकाने किंवा टपऱ्यांमध्ये लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र होलसेल मार्केटमध्ये अजूनही मोबाईल दुरुस्ती चे साहित्य परदेशातून येत असल्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे दोन-तीन आठवड्यानंतर कळेल असे एकंदर चित्र आहे.

आज बाजारपेठा सुरू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अर्धी दुकाने उघडली होती. त्यात मोबाईल ही सध्याची जीवनावश्यक वस्तू झाल्यामुळे मोबाईलच्या खरेदीसाठी तसेच दुरुस्तीसाठी लोकांनी छोट्या दुकानात बाहेर चांगलीच गर्दी केली होती. अनेकांच्या मोबाइलचे स्क्रीन तुटले होते. अनेकांना बॅटरी बदलून हव्या होत्या. काहींचे इयरफोन फोन खराब झाले होते. मोबाईलच्या बटन मध्ये काही प्रॉब्लेम होते, असे सलीम शेख या गोरेगावच्या दुकानदाराने सांगितले.

हेही वाचा: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोठा दिलासा; पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश...

मात्र अनेक ठिकाणी मोठ्या मॉलमधील व मोठ्या शॉपिंग सेंटर मध्ये मोबाईलचे दुकान उघडायला परवानगी मिळाली नसल्यामुळे ग्राहक नाराज झाल्याचे चित्र दिसून आले. मोबाइल दुरुस्ती चे सुटे भाग हे चीनमधून आयात होतात. सध्या हवाईमार्गे होणारी आयात संपूर्ण बंद असून जलमार्गे होणाऱ्या तुटपुंज्या आयातीवरच काम भागवावे लागत आहे. ही आयात अजूनही पूर्ण वेगाने सुरू झाली नाही. त्यामुळे सध्या आमच्याकडे असलेल्या साठ्यावरच कसेतरी काम भागवून द्यावे लागत आहे. एकदा का आमच्याकडे साठा संपला की किरकोळ दुकानदारांना त्याची टंचाई भासू लागेल, असे एका होलसेल विक्रेत्याने सांगितले. 

असलम मलकानी या होलसेल विक्रेत्यांचे मनीष मार्केटमध्ये मोबाईलच्या सुट्या भागांच्या विक्रीचे मोठे दुकान आहे. मात्र ते शॉपिंग सेंटर असल्यामुळे त्याला अद्याप उघडायला परवानगी मिळाली नाही. मात्र तरीही त्यांच्याकडे मोबाईल दुरुस्ती बाबत विचारणा करणारे किमान चाळीस-पन्नास दूरध्वनी रोज येत आहेत. लॉक डाऊन पूर्वीपासून काहींनी त्यांच्याकडे दिलेले मोबाईल अद्यापही दुरुस्ती न झाल्यामुळे तसेच पडले आहेत. चीनमधून अद्याप म्हणावी अशी आयात सुरू झाली नाही असेही मलकानी यांनी सकाळ'ला सांगितले. मात्र किरकोळ दुकानात मोबाईलच्या खरेदीसाठी तसेच दुरुस्तीसाठी गर्दी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 2 मिनिटं काढा आणि हे आधी वाचा, मास्क लावून जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम कराल आणि भयंकर स्थिती ओढावेल... 

 मोबाईल ही सध्या अत्यावश्यक गोष्ट झाली असून करमणुकीसाठी तसेच कामासाठीही त्याचा मोठा वापर होतो. त्यामुळे सध्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात ग्राहक अगदी महागडे मोबाईल नाही तरी स्वस्तातले मोबाईल घेतच आहेत, असेही ते म्हणाले. सध्या अनेक दुकानांमधील नोकर तसेच दुकानांना माल पुरवणारे किरकोळ विक्रेते हे गावी निघून गेले आहेत, मदतनीसही कामावर येत नाहीत. 

सत्तर-ऐंशी दिवसांच्या लॉकडाऊन नंतर बाजारपेठा सुरू होऊन एक दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे आज बाजारात गर्दी दिसते आहे. मात्र एक दोन आठवड्यांनी आपल्याला नक्की परिस्थिति कळेल. मोठ्या खरेदीला लोकांचा प्रतिसाद कसा आहे, लॉकडाऊन मुळे नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचे नेमके किती नुकसान होणार आहे, हे आपल्याला नंतरच कळेल असेही मलकानी यांनी सांगितले.

people in mumbai make crowd at mobile stores read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in mumbai make crowd at mobile stores read full story