जनता पुरामुळे त्रस्त; 'मातोश्री' साताऱ्यातील नेत्याच्या पक्ष प्रवेशात व्यस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' या निवासस्थानी खास पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रंगला. याच कार्यक्रमात माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेखर गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधेले.

मुंबई : पुरामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष प्रवेश कार्यक्रमात व्यस्त आहेत. राज्यातील पूर परिस्थितीकडे कानाडोळा करत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे हे सध्या विरोधकांच्या टीकेचे लक्ष झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' या निवासस्थानी खास पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रंगला. याच कार्यक्रमात माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेखर गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधेले. त्यामुळे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलली आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

राज्यातील पूर परिस्थितीमुळे शिवसेनेचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. स्थानिक आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत. मी आणि आदित्य पूर परिस्थिती बघायला जाणार आहोत. सांगली-कोल्हापूरात गंभीर परिस्थिती असल्याचे सांगितले. तसेच मोठा पूर येऊन गेल्यानंतर आरोग्याची एक दुसरी भीती असते, त्यामुळे शिवसेनेच्य़ा वतीने आरोग्य सुविधी उपलब्ध करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

या सर्व प्रकारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला जनतेशी काहीही देण घेणे नाही. हे फक्त आमदार फोडून सत्ता मिळवण्यात व्यस्त आहे. या आधी असे महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते. त्यामुळे ही निंदनीय बाब आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.

खटाव-मान विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेखर गोरे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज गोरे यांनी पक्ष प्रवेश केला. शेखर गोरे हे खटाव-माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People suffer from floods but leader of Shiv Sena busy in party events