चोरीछुपे प्लास्टिक वापरणाऱ्यांना दणका 

चोरीछुपे प्लास्टिक वापरणाऱ्यांना दणका 

वसई : वसई-विरार महापालिकेने प्लास्टिक पिशव्या हद्दपार व्हाव्यात, यासाठी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत चोरी-छुपे पिशव्या विकणाऱ्या विक्रेत्यांवर छापासत्र सुरू असून आतापर्यंत 6 लाख रुपये दंड वसूल करत प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाईसाठी आयुक्त बी. जी. पवार यांनी पथकही तयार केले आहे. 

वसई-विरार शहरात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर भाजी, फळ, अन्य विक्रेते, दुकानदार, हॉटेल्समध्ये सुरू आहे. गुजरातहूनदेखील महामार्गावरून चोरीछुपे प्लास्टिक वसईत दाखल होत आहे. त्यामुळे होलसेल विक्रेत्यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पालिकेने थेट दंडनीय कारवाईसाठी पथक तयार केले असून हे फिरते पथक, नालासोपारा, वसई, विरार , चंदनासार, बोळिंज, पेल्हार, नवघर-माणिकपूर, आचोळे, वालीव या प्रभागात तपासणी करत आहे.

अधिकारी आणि एकूण 60 हून अधिक कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश आहे. महापालिकेने प्लास्टिकविरोधी कारवाई करण्याआधी नागरिकांमध्ये जनजागृती केली. पथनाट्य, फलक यासह नागरिक, दुकानदार आदींच्या बैठका घेतल्या. त्यानंतर काही दिवस प्लास्टिक वापरात नव्हते; मात्र पुन्हा "जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली आहे. 
महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तब्बल 500 हून अधिक दुकानांची तपासणी केली असून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करत पिशव्यादेखील जप्त करण्यात येत आहेत. पर्यावरणाला घातक पिशव्यांचा वापर नागरिकांनीदेखील न करता जे दुकानदार प्लास्टिक वापरत आहेत, त्यांची माहिती द्यावी, असे आवाहनदेखील महापालिका प्रशासनाने केले आहे. 

वसई-विरार महापालिकेचे पथक प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करत आहे. तपासणी करून प्लास्टिक जप्त केले जात आहे. सद्यस्थितीत कारवाईमुळे प्लास्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. 
- वसंत मुकणे, वरिष्ठ अधिकारी, स्वच्छता विभाग 

पर्यावरणासाठी प्लास्टिक घातक आहे. त्याचे दुष्परिणाम मानवाला होत आहेत. त्यामुळे बाजारहाट तसेच दैनंदिन कामकाजासाठी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. नागरिकांनी कापडी पिशव्या वापराव्यात. तसेच दुकानदारांनीदेखील कागदी पिशव्यांतून वस्तू ग्राहकांना द्याव्यात, तरच वसई विरार शहर प्लास्टिकमुक्त होईल. 
- कीर्ती शेंडे, अध्यक्षा, ध्यास फाउंडेशन, वसई 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com