लॉकडाऊनचा असाही सदुपयोग; कासारवाडी ग्रामस्थांनी धरली स्वच्छतेची कास

अमित गवळे
Sunday, 24 May 2020

नवतरुण मित्र मंडळाने स्वच्छतेची कास धरत फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेत संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविली आणि एक विधायक संदेश दिला.

पाली ः सध्या कोरोनाच्या संकटामुळे शहरातील चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला असून उन्हाळ्यामुळे सध्या अनेकांकडे फावला वेळही आहे. त्यावेळेचा फायदा घेत लॉकडाऊनच्या निमित्ताने सुधागड तालुक्यातील कासारवाडी येथील परतलेले रहिवाशी, ग्रामस्थ, नवतरुण मित्र मंडळाने स्वच्छतेची कास धरत फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेत संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविली आणि एक विधायक संदेश दिला.

मोठी बातमी ः आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

ठाणे, मुंबई, पुणे शहरातून सुधागड तालुक्यातील कासारवाडी येथे अनेक चाकरमानी परतले आहेत. त्यांच्यासह ग्रामस्थांनी आपल्या गावात इतर रोगराई पसरू नये, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोरोनाबाबत शासनाच्या असणाऱ्या नियमांचे पालन करत, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि मास्क वापरून हातात झाडू, फावडे, कुदळ, कचरागाडी आदी साहित्य घेऊन गावकरी कामाला लागले आणि बघता बघता गावकऱ्यांनी गावातील सर्व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, गल्ली, पाणवठा विभाग, नाले स्वच्छ केले. गटारातील सांडपाण्याचा मार्ग मोकळा केला. तसेच आता संपूर्ण गावात ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. अशाप्रकारे कासारवाडीतील ग्रामस्थांनी एक आदर्श घालून दिला आहे.

मोठी बातमी ः बॉलिवू़ड हादरलं! आणखी एका अभिनेत्याला कोरोनाची लागण

दोन महिन्यांपूर्वी मी ठाण्यावरून गावात आलो. आपल्याला कोरोना विरुद्ध लढाई जिंकायची असेल तर पहिले आपला परिसर आणि गाव स्वच्छ ठेवायची गरज आहे. हे जाणून नियम पाळत सर्व गावकऱ्यांनी मिळून स्वच्छता मोहीम हाती घेतली. 
- रोहिदास कडू, ग्रामस्थ, कासारवाडी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peoples of kasarwadi of raigad district cleans village using lockdown