रविवारीही पोटपूजा सोडून नोटपूजा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

मुंबई - रविवारच्या सुटीचा दिवस अनेकांचा आरामात जातो. हक्काची रजा असल्याने कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता येतो...  मात्र, आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. अनेक मुंबईकरांनी कुटुंबीयांना सोबत घेऊन सकाळीच बॅंक गाठली. तिथली गर्दी बघून एटीएम सेंटरकडे धाव घेतली...

मुंबई - रविवारच्या सुटीचा दिवस अनेकांचा आरामात जातो. हक्काची रजा असल्याने कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता येतो...  मात्र, आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. अनेक मुंबईकरांनी कुटुंबीयांना सोबत घेऊन सकाळीच बॅंक गाठली. तिथली गर्दी बघून एटीएम सेंटरकडे धाव घेतली...

आराम, मांसाहार अन्‌ पोटपूजा सोडून उपाशीपोटी सर्व जण नोटपूजेसाठी धडपडत होते. नवीन नोटा संपल्या, एटीएम बंद, फक्त खातेदारांनाच पैसे द्यायचा निर्णय, नोटा बदलण्याबाबत असमर्थता आदी अनेक विघ्ने जाणवल्याने अनेकांचा सुटीचा रविवार म्हणजे बिनपैशाचा तमाशाच ठरला. 
कामावर जायचे नसल्याने रविवारी सायंकाळपर्यंत बॅंकेत अन्‌ रात्री उशिरापर्यंत एटीएमसमोर खातेदारांची झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी एटीएम बंद पडल्या, बॅंकांनी फक्त खातेदारांनाच पैसे दिले, काही बॅंकांचे सर्व्हर बंद पडले आदी कारणांमुळे सुटी फुकट गेली. अनेक ठिकाणी आज पोस्टात व बॅंकांमध्ये टोकन पद्धत सुरू झाली. सोमवारी बॅंका बंद राहणार असल्याने रविवारी कितीही वेळ लागला तरीही पैसे घ्यायचेच, असा निर्धार करूनच खातेदारांनी बॅंकांमध्ये मोर्चा वळवला होता. सकाळपासून ते रांगेत उभे होते. उपनगरांमध्ये दुपारपर्यंत मोठ्या रांगा होत्या; पण दक्षिण मुंबईत शनिवारच्या तुलनेत कमी गर्दी होती. अनेक बॅंकांनी शनिवारपासूनच बिगरखातेदार व खातेदारांनाही थेट पैसे बदलून देण्याची सुविधा बंद केली. खातेदारांनी हवे तेवढे पैसे खात्यात जमा करावेत; पण त्यांना एका दिवशी दोन हजारच काढता येतील, अशी कार्यपद्धती बॅंकांनी वापरली.

बिगरखातेदारांना पैसे बदलून देणे बऱ्याच बॅंकांनी बंद केल्याने आज अनेक ठिकाणी गोंधळ उडून वादावादी झाली. आमच्याच खातेदारांना पैसे देताना आम्हाला नाकीनऊ येत आहेत, तर ओळखपाळख नसलेल्या इतरांना कोठून पैसे देऊ, अशा शब्दांत कर्मचारी त्यांना समजावत होते. अनेक बॅंका व पोस्टांमध्ये ५० खातेदारांना टोकन दिले जात होते. त्या क्रमांकानुसार त्यांना बोलावले जात होते. त्यामुळे त्यांचा रांगेचा त्रास वाचला.

निर्णयाच्या समर्थनासाठी पवईत रॅली 
मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी पवईतील नागरिकांनी रॅली काढली. ‘काले धन के सर्जिकल स्ट्राईक में हम आपके साथ हैं’, ‘काले धन के खिलाफ आप का संघर्ष वंदनीय हैं’आदी घोषणांनी पवई दुमदुमली. रॅलीला समर्थन देण्यासाठी विधान परिषद सदस्य व मुंबई उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. एन. सिंह, मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित सिंह आदी उपस्थित होते. 

लोकप्रतिनिधी आले मदतीला
मोठ्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळेच अभूतपूर्व परिस्थिती उद्‌भवल्याचे ओळखून भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी रांगेतील खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. छत्र्या, खुर्च्या, पाणी, नाश्‍ता आदी पदार्थांचे वाटप त्यांनी सुरू केले. नागरिकांची चौथ्या दिवशीही त्रासातून मुक्तता होत नसल्याचे पाहून सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी मैदानात उतरले. भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आदी सर्वपक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांनी रांगेतील खातेदारांसाठी पाणी-वडापावपासून खुर्च्या, छत्र्या आदींची सोय केली. उशिरा का होईना; पण त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.

खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण
अद्यापही अनेक लहान ट्रॅव्हल एजन्सी, छोट्या व्यायामशाळा आदींतर्फे जुन्या चलनातील रोख रक्कम स्वीकारली जाईल, असे संदेश उघड उघड मोबाईलवर येत आहेत. काही चार्टर्ड अकाऊंटंटही ‘कर वाचविण्याचा सल्ला हवा असेल तर आमच्याकडे या’ अशा सूचक शब्दांत काळा पैसा साठविणाऱ्यांना आमंत्रण देत असल्याचेही दिसून आले. काही सहकारी ग्राहक भांडारांनीही केंद्र सरकारच्या परिपत्रकाचा वेगळा अर्थ लावून क्रेडिट कार्डधारकांनाही परिचयपत्राची झेरॉक्‍स देण्यास सांगितले. परिणामी परिचयपत्रे न आणलेल्या अनेक ग्राहकांना हात हलवत परत जावे लागले.

सिटीलाईटमधील आयडीबीआय शाखेत वादावादी
सिटीलाईट परिसरातील आयडीबीआयच्या शाखेत सकाळी सर्व्हर बंद पडल्यामुळे गोंधळ उडाला. ९ वाजता शाखेत आलेल्या खातेदारांना साडेबारापर्यंतही पैसे मिळाले नव्हते. बॅंकेचा मुख्य सर्व्हर बंद पडल्याचे कारण कर्मचारी देत होते. काम थंडावल्याने नोटांच्या प्रतीक्षेत असलेल्या खातेदारांचा संयम सुटला आणि थोडी वादावादी झाली.

जुन्या नोटा टाटा पॉवर स्वीकारणार
टाटा पॉवरने आपली वीजबिल केंद्रे रविवारीही सुरू राहतील, अशी घोषणा करतानाच पाचशे व हजारच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असे जाहीर केल्याने अनेकांना दिलासा मिळाला. ही सवलत फक्त घरगुती ग्राहकांसाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: peoples sunday in bank