मुलीसोबत नाव जोडण्यासाठी अविवाहित आईची याचिका

सुनीता महामुणकर
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - मुलांच्या नावात वडिलांचे नाव लावण्याबरोबरच आईचेही नाव वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली, तरी अविवाहित मातांसाठी अद्याप हा दिलासा कोसो दूर आहे. अशाच एका अविवाहित आईने आपल्या मुलीच्या नावात स्वतःचे नाव लावण्यास नकार देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या या सुशिक्षित महिलेने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. स्वतः जन्म दिलेल्या मुलाला किंवा मुलीला आईचे नाव लावण्याचा अधिकार एकल पालक आणि अविवाहित महिलांना आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. यासाठी संबंधिताने शपथपत्र आणि बाळाचा जन्मदाखला स्थानिक प्रशासनाकडे दाखल करावा, असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे; तरीही महापालिकेने याचिकादार महिलेने केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यास नकार दिला आहे. मुलीच्या वडिलांचे नाव उघड करायचे नाही, त्यामुळे माझे नाव लावण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती; परंतु याबाबत न्यायालयातून आदेश आणा, असे सांगून त्यांचा अर्ज आरोग्य विभागाने ऑगस्टमध्ये नामंजूर केला. त्यांनी ऍड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे.

बुधवारी न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख ऍड. भूषण देशमुख यांनी केला. मुलीच्या दाखल्यात केलेला वडिलांच्या नावाचा उल्लेख रद्द करून त्याऐवजी स्वतःचे नाव दाखल करायचे आहे; मात्र अविवाहित असल्यामुळे याला परवानगी मिळत नाही, असे खंडपीठापुढे सांगण्यात आले. पालिकेने दिलेला आदेश रद्द करून सर्व कागदपत्रांची छाननी करावी आणि माझे नाव मुलीच्या नावासोबत जोडावे, अशी मागणी या महिलेने केली आहे.

Web Title: petition in court