"कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी सस्पेंड करा"; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

सुनीता महामुणकर
Thursday, 3 December 2020

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी मोर्चावरील एक ट्विटही सध्या कंगनासाठी त्रासदायक ठरले आहे.

मुंबई, ता. 3 : नेहमी सुसाट ट्विटकरुन वादात सापडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी सस्पेन्ड करण्याची मागणी करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. कंगना ट्विटमधून सामाजिक अशांतता आणि धार्मिक तेढ निर्माण करते, असा आरोप याचिकेत केला आहे.

ऍडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांनी ही याचिका केली आहे. याचिकेत कंगनासह, ट्विटर आणि राज्य सरकारला प्रतिवादी केले आहे. सतत द्वेष पसरविणारे, आधारहिन आणि प्रतिमा मलीन करणारे ट्विट ती करत असते. यामुळे लोकांमध्ये गैरसमज आणि तणाव निर्माण होत आहे, त्यामुळे तीचे अकाऊंट निलंबित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. 

महत्त्वाची बातमी दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये

याचिकेत ट्विटरला देखील प्रतिवादी केले आहे. ट्विटरने यापूर्वी कंगनाच्या बहिणीचे ट्विटर अकाऊंट काही कालावधीसाठी याच कारणामुळे निलंबित केले होते.सामाजिक तेढ निर्माण करू नये, असा ट्विटरचा नियम आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. कंगनाने केलेली विविध ट्विटचा दाखला यामध्ये दिला आहे. पाकव्याप्त काश्मीर, शेतकरी, विशिष्ट समाज गट आदींचा समावेश यामध्ये आहे. देशमुख यांनी कंगना विरोधात वांद्रे न्यायालयातही यापूर्वी तक्रार केली आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी मोर्चावरील एक ट्विटही सध्या कंगनासाठी त्रासदायक ठरले आहे. हे ट्विट तीने डिलीट केले आहे. मात्र त्याविरुद्ध पंजाबमध्ये तक्रार दाखल झाली आहे.

petition filed in bombay high court permanently suspend twitter account of kangana ranaut

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petition filed in bombay high court permanently suspend twitter account of kangana ranaut