माणसांना नाही जमलं ते चक्क कबुतराने केलंय! 

बदलापुरातील प्रदीप पाटील यांच्या घरातील खिडकीत असलेले कबुतर
बदलापुरातील प्रदीप पाटील यांच्या घरातील खिडकीत असलेले कबुतर

डोंबिवली : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईसह शहरी भागात केवळ कावळे आणि कबुतर हे दोनच पक्षी प्रामुख्याने शिल्लक राहिले आहेत. कोरोनामुळे सध्या देशभरात संचारबंदी लागू आहे. असे असताना देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. वाडवडलांपासून म्हटले जाते की अनेकदा माणसापेक्षा मुके प्राणी शहाण्यासारखे वागतात. याचाच प्रत्यय बदलापुरात आला आहे. येथील एका इमारतीच्या खिडकीमध्ये संचारबंदीच्या काळात घरी राहण्याचा निश्चय करत एका कबुतराने गेल्या 25 दिवसांपासून चक्क घरातच मुक्काम ठोकला आहे.

बदलापूर पूर्वच्या समर्थ नगर परिसरात मेघना पार्क या गृहसंकुलात अॅड. प्रदीप पाटील राहतात. काही दिवसांपूर्वी अचानक एक कबुतर त्यांच्या खिडकीच्या जाळीत आले ते पुन्हा परत गेलेच नाही.

अन्नाच्या शोधात कबुतर आले असावे असा विचार करून पाटील कुटुंबीयांनी त्याला पहिल्या दिवशी जाणकारांचा सल्ला घेऊन अन्न पाणी दिले. एव्हाना कबुतर गेले असावे असा अंदाज पाटील यांनी लावला; मात्र त्यांचा अंदाज खोटा ठरला. मग काय, रोजच कबुतराची खातीरदारी करण्याचा दिनक्रम सुरू झाला. 
   
पाहता पाहता कबुतराने इवलेसे घरटेही बांधले आणि दोन अंडीही दिली. 
आसपासच्या परिसरातून येणारे इतर पक्षांचे आवाज, बसण्यासाठी गोणपाट, शेजारीच पाणी भरून ठेवलेले भांडे आणि मुख्य म्हणजे गॅलरीत मिळालेली सावली यामुळे हे कबुतरही जणू काही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लॉकडाऊनचे पालन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. या कबुतराची घरातील एका सदस्याप्रमाणे देखभाल करत असून, त्यालाही कुटुंबीयाचा लळा लागल्याचे पाटील म्हणाले. 

कबुतरामुळे श्वसन व इतर आजार बळावत असल्याचा सल्ला मित्रांनी दिला. मात्र आम्ही योग्य ती काळजी घेऊन देखभाल करत आहोत. सध्या मनुष्यप्राणी सगळे जाणून देखील कायदे मोडत आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांकडून माणसाने कायदे कसे पाळावे हे शिकले पाहिजे. 
- प्रदीप पाटील, वकील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com