खड्ड्यांमुळे प्रवाशांना धक्के

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

वाडा बसस्थानकात चालकांची कसरत; चालणेही कठीण 

वाडा ः वाडा बसस्थानकात पावसाळ्यापूर्वी पडलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्याने आता या खड्ड्यांची खोली अर्धा ते एक फुटापर्यंत गेली आहे. त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक बसचे स्वागत खड्ड्यांतून होत असल्याने नव्याने बस घेऊन येणाऱ्या चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने प्रवाशांची आदळआपट होत आहे. 

वाडा तालुका हा पालघर आणि ठाणे जिल्हाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पालघर  दिवसभरात वाडा बसस्थानकातून विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या तीनशेहून अधिक बसफेऱ्या आहेत. या सर्व बस आगारातील या खड्ड्यांमधून आदळून-आपटून निघत असल्याने एसटी बसगाड्यांचे नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे. 

वाडा एसटी आगार येथे असलेल्या भव्य जागेत बसस्थानक बांधण्यात आले आहे; मात्र हे बसस्थानक वाडा बाजारपेठेपासून 300 ते 350 मीटरवर असल्याने वाडा शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी ते सोईस्कर नसल्याने शहरातील जुन्याच बसस्थानकातून प्रवाशांची वाहतूक होत आहे. येथून रोज मोठ्या संख्येने प्रवासी आणि विद्यार्थी बसमधून प्रवास करीत आहेत. या प्रवाशांना येथील खड्ड्यांचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. 

वाडा बाजारपेठेतील बसस्थानकातील खड्डे, अपुरी जागा व येथे येणाऱ्या बसफेऱ्यांची संख्याही जास्त असल्याने बसस्थानक आवारात नेहमीच वाहतूक कोंडी होते. येथील बसस्थानक वाडा एसटी आगारात असलेल्या नवीन बसस्थानकात हलवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. 

वाडा बसस्थानकाच्या अपुऱ्या जागेमुळे नेहमीच येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बसस्थानक वाडा आगाराच्या जागेत स्थलांतरित करावे. 
धनंजय पष्टे, उप-तालुकाप्रमुख, शिवसेना, वाडा तालुका 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pilgrims hit passengers in Wada near Mumbai