शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याचा प्लॅन; चोरांना फिल्मी स्टाईलमध्ये अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

मुंबईच्या मालाडमधील दिंडोशी परिसरात एका शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांनी अटक केली आहे.

शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याचा प्लॅन; चोरांना फिल्मी स्टाईलमध्ये अटक

मुंबई - मुंबईच्या मालाडमधील दिंडोशी परिसरात एका शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. हे दरोडेखोर अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरून शॉपिंग मॉलमध्ये दरोडा टाकण्यासाठी आले होते. अफजल अस्लम खान उर, आरिफ शफी अहमद अन्सारी, विघ्नेश व्यंकटेश देवेंद्र अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व अटक आरोपींवर दरोडा, चोरी, प्राणघातक हल्ला आणि खंडणीचे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, 2 चोरीचे मोबाईल फोन आणि चोरीची ऑटो रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

असा फसला प्लॅन

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरी निवारा परिसरात असलेल्या अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या तिन्ही दरोडेखोरांनी मध्यरात्री अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरली होती. दिंडोशीतील नागरी निवारा परिसरात आल्यानंतर हे सर्व आरोपी लुटण्याच्या बेतात असताना तेथे उपस्थित काही लोकांना संशय आला. ही माहिती दिंडोशी पोलिसांना देण्यात आली. दिंडोशी पोलीस पथकाने तातडीने शॉपिंग सेंटरबाहेर सापळा रचला. हे दरोडेखोर मॉलजवळ पोहोचताच लुटलेला मुद्देमाल घेऊन पोलिसांनी त्यांना घेरले. मात्र आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी अगदी चित्रपटात दाखवतात तसे फिल्मी स्टाईल मध्ये चोरांचा अंधेरीपर्यंत पाठलाग केला. अखेरीस तेथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक रिक्षा जप्त करण्यात आली असून ती लुटण्याच्या उद्देशाने अंधेरी येथून चोरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.