नियोजित मेट्रो कारशेड प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण करावे; भातखळकर यांची मागणी

नियोजित मेट्रो कारशेड प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण करावे; भातखळकर यांची मागणी

मुंबई ः आरेमधील मेट्रो कारशेड नव्या ठिकाणी उभारण्यासंदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींसमोर करावे, अशी मागणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  यासंदर्भातील सौनिक समितीचा अहवाल सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. कांजूरमार्ग येथील मिठागर जागेचे पुढे काय होणार हे अद्याप ठरले नाही. तरीही आता  मेट्रो कारशेड बिकेसी येथे हलविण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी सांगून मुंबईकरांच्या मनात आणखीनच गोंधळ निर्माण केल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे. 

आरे येथील कारशेडला सर्व परवानग्या मिळाल्या असताना सुद्धा व तेथील 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालेले असताना सुद्धा मेट्रो कारशेड इतरत्र हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेताना मुंबईबद्दल 'चांगलाच' विचार मुख्यमंत्र्यांनी केला असेल. त्यामुळे नवीन ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याच्या नियोजनाचे व ब्लु प्रिंट चे मुंबईतील लोकप्रतिनिधीना सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी आग्रही मागणीही भातखळकर यांनी आज पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मेट्रो कारशेड आरे येथून कांजूरमार्ग येथे हलविण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊन राज्य सरकारला जोरदार चपराक दिली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी ठाकरे सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या सौनिक समितीचा अहवाल सुद्धा अद्याप खुला करण्यात आलेला नाही. आरे कारशेडच्या गोंधळामुळे मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान पाच वर्षाचा वाढीव कालावधी लागणार असून दिवसाला अडीच कोटींचे नुकसान होणार आहे. याचा संपूर्ण भुर्दंड मेट्रो तिकिट दरवाढीच्या रुपाने मुंबईकरांच्याच माथी मारला जाणार आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

जनतेच्या मनातील हा गोंधळ व रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नियोजित केलेला नव्या कारशेडचा आराखडा मुंबईतील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या समोर मांडावा व सौनिक समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करावा, असेही भातखळकर यांचे म्हणणे आहे. तसेच आरे मधून कारशेड इतरत्र हलविण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी कोणता 'चांगला' विचार केला होता हे सुद्धा जनतेला सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

The planned metro car shed project should be presented by the Chief Minister Bhatkhalkars demand

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com