कल्याण पुर्वमध्ये प्लास्टिक बंदीचे आवाहन

रविंद्र खरात 
रविवार, 8 एप्रिल 2018

50 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक अथवा थर्माकॉल पासून बनविलेले साहित्य वापरण्यास बंद केले आहे. कल्याण पूर्व शहर स्वच्छ व पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास सहकार्य करण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण - सहयोग सामाजिक संस्था आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कल्याण पूर्व मध्ये एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे . 50 मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक अथवा थर्माकॉल पासून बनविलेले साहित्य वापरण्यास बंद केले आहे. कल्याण पूर्व शहर स्वच्छ व पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास सहकार्य करण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेचे ड प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि सहयोग सामाजिक संस्थेच्या मार्फत शनिवार ता 7 एप्रिल रोजी कल्याण पूर्व मध्ये विजय नगर परिसरात गांधीगिरी स्टाईलने प्लास्टीक आणि थर्माकॉल वापर करणाऱ्या दुकानदार, व्यापारी, हातगाडीवर व्यवसाय करणारे फेरीवाले यांचे प्रबोधनही केले तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली.

कल्याण पूर्व मधील शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, सार्वजनिक उपक्रम, कंपनी, नर्सिंग होम, हॉटेल, धार्मिक स्थळे, बाजारपेठ, क्रीडा संकुल, आदी परिसरात फिरून प्लास्टीक पिशव्या आणि थर्माकॉल वापर करू नका याची कल्याण डोंबिवली मनपा ड प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि सहयोग सामाजिक संस्थेमार्फत जनजागृती करत आता दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

प्लास्टीक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच प्लास्टीक / थर्माकॉल पासून बनविल्या जाणाऱ्या अन्य वस्तूच्या उत्पादन, वापर साठवणूक, वितरण व विक्री करण्यास निर्बंधाबाबत वारंवार आदेश देऊनही कल्याण पूर्व मध्ये दुकानदार, फेरीवाले, व्यापारी प्लास्टीक पिशव्याचा वापर करत असल्याचे चित्र पाहता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि सहयोग सामाजिक संस्थेच्या मार्फत शनिवारी कल्याण पूर्व मधील विजय नगर परिसरात प्रत्येक दुकान, गाळे, हात गाड्या वर जाऊन प्लास्टीक पिशव्या वापर करू नये असे आवाहन करत एक माहिती पत्रक दिले. तर वारंवार सूचना देऊन ही आज ही प्लास्टीक पिशव्यांचा वापर करत आहेत त्यांच्याकडून प्लास्टीक पिशव्या आणि थर्माकॉल शेकडो किलोचा मुद्देमाल जप्त करत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत .

प्लास्टीक पिशव्या आणि थर्माकॉल बंदी आणि त्याचा वापर करणाऱ्याचे प्रबोधन आणि कारवाई बाबत पालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सहयोग सामाजिक संस्थेला सोबत घेऊन कल्याण पूर्व मध्ये प्रबोधन सोबत कारवाई सुरू आहे. नागरिकांनी त्याचा वापर टाळा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिका ड प्रभाग क्षेत्र आरोग्य निरीक्षक एल. के. पाटील यांनी दिली.

प्लास्टीक पिशव्या वापर करू नये आणि त्यावर बंदी आणण्यासाठी पालिका ते केंद्र सरकार पर्यन्त सहयोग च्या मार्फत पाठपुरावा केला होता. आज त्याला न्याय मिळाला असून जनतेच्या सहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही, यासाठी पालिकेसोबत नागरिकांचे आम्ही आगामी काळात प्रबोधन करणार आहोत अशी माहिती सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic Ban Appeals at Kalyan East Mumbai