गणेशमूर्तींसाठी प्लास्टिक परवानगी ; पावसापासून रक्षणासाठी निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

पालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्या दालनात आज सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मूर्तीवर वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकला बंदी नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मुंबई : विघ्नहर्त्यापुढील प्लास्टिकबंदीचे विघ्न हटले असून पावसापासून संरक्षणासाठी मूर्तींवर प्लास्टिक टाकण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, प्रसादासाठी कागदी द्रोण वापरण्याची सक्तीही पालिकेने गणेश मंडळांना केली आहे. 
कारखान्यांतून गणपतीची मूर्ती घेऊन पावसापासून रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर केला जात होता. मात्र, प्लास्टिकबंदीमुळे या वापरावरही बंदीची भीती गणेशभक्तांना होती. 

पालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्या दालनात आज सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मूर्तीवर वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकला बंदी नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. 
प्लास्टिकचा वापर करण्यास पालिकेने परवानगी दिली असली तरी प्रसादासाठी प्लास्टिकची पिशवी वापरता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. प्रसादासाठी कागदाचे द्रोण किंवा बटर पेपर वापरावा, अशी शिफारस पालिकेने केली आहे. 

मंडळांवर जबाबदारी... 

गणेशोत्सव काळात प्लास्टिकचा वापर होऊ नये म्हणून समन्वय समितीला माहिती देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. तसेच मंडळांनी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे. या बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड्‌. नरेश दहिबावकर उपस्थित होते. 

Web Title: Plastic permission for Ganpati Statue