सर्जिकल स्ट्राईक्‍सचे श्रेय मोदींना जास्त :पर्रीकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

''हल्ल्याचा निर्णय व आखणी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारला या श्रेयाचा मोठा वाटा द्यावयास हवा.''

मुंबई - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्‍सचे श्रेय हे सर्व भारतीयांचे असल्याचे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (बुधवार) व्यक्त केले.

यांमध्ये या सर्जिकल स्ट्राईक्‍सविषयी शंका घेतलेल्यांचाही समावेश असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. हे सर्जिकल स्ट्राईक्‍स एखाद्या राजकीय पक्षाने केले नसून भारतीय लष्कराने केले असल्याने याचे श्रेय सर्वच भारतीयांचे असल्याचे पर्रीकर म्हणाले. मात्र याचवेळी, या हल्ल्याचा निर्णय व आखणी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारला या श्रेयाचा मोठा वाटा द्यावयास हवा, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्‍त केली! 

सर्जिकल स्ट्राईक्‍ससंदर्भातील जनतेच्या भावनांची जाणीव असल्याचे स्पष्ट करत पर्रीकर यांनी आता जनतेचे समाधान झाल्याची भावना व्यक्‍त केली. सर्जिकल स्ट्राईक्‍ससंदर्भात काही राजकीय पक्षांनी "शंका‘ उपस्थित करत पुराव्याची मागणी केली आहे; तर काही राजकीय नेत्यांनी भारतीय जनता पक्षाकडून या घटनेचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर संरक्षण मंत्र्यांची ही भूमिका महत्त्वपूर्ण व संवेदनशील मानली जात आहे. 

Web Title: PM Narendra Modi should be given credit for Surgical Strikes, says Manohar Parrikar