
PM Modi Visit To Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा...पीक अवर्स मध्ये मुंबईत वाहतूक कोंडीची परिस्थीती
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्भूमीवर वाहतुकीवर निर्बंध आणि रस्त्यांवरील बदलांमुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरीय भागात गुरुवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ, वाकोला अंधेरी, भागात तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी परिसरात वाहतूक कोंडी दिसून आली. पंतप्रधानांचा दिवसभराचा दौरा पाहता वाहतूक पोलिसांनी वेस्टर्न एक्स्प्रेस वे, ईस्टर्न एक्स्प्रेस वे आणि अनेक महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यवस्था केली होती.
वाहतूक पोलिसांकडून काही मार्गांवर प्रवेश बंदी होती तर दुसरीकडे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले. मोठ्या संख्येने चाकरमानी बीकेसी या मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्रात कार्यरत असतात. अशा ठिकाणी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळणे हे पोलिसांसाठी आव्हान होते
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कोंडी
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना गुरूवारी दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत प्रवेश बंदी घालण्यात आली होती. या मुळे, बीकेसी कडे जाणार्या इतर रस्त्यांवर ट्रॅफिक जाम दिसून आले, काही ठिकाणी वाहनांची वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ते अंधेरी कुर्ला रोडच्या दिशेने लीला हॉटेल जंक्शनवर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच लीला हॉटेल जंक्शनपासून घाटकोपरच्या दिशेने वांहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
पीक अवर्समध्ये मेट्रो बंद
पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा गुरूवारी काही काळ बंद ठेवली होती. गुरूवारी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून 7 वाजून 30 मिनिटांपर्यंत वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद होतो. ही गर्दीची वेळ असल्यामुळे मेट्रो बंद ठेवण्याच्या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फटका बसलेला पहिला मिळाला आहे.
मुंबईत संध्याकाळी 6 वाजल्यापासून पिक अवर्स सुरू होतात. मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या घराच्या दिशेने जाण्यासाठी मेट्रो, लोकल सारख्या साधनांचा वापर करतात.चकाला , मरोळ, साकीनाका, जे बी नगर या भागात काम मोठ्या प्रमाणात व्यावसायिक केंद्र आहे. पीक अवर्समध्ये मेट्रो बंद असल्यामुळे येथील चाकरमान्यांना बेस्ट अथवा रिक्षा शिवाय पर्याय नव्हता. परिणामी बेस्ट बसला तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. बेस्ट बसला गर्दी झाल्यामुळे काही चाकरमानी पायी अंधेरी अथवा घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे निघाल्याचे पाहायला मिळाले.
"नेते मंडळी दोन तासाच्या दौऱ्यासाठी येतात आणि पूर्ण व्यवस्था होऊन जाते मुंबईकरांसाठी एकीकडे आनंदाचा दिवस असला तरी दुसरीकडे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे"
- शब्बीर शेख, चाकरमानी
"नेहमीच पीक अवर्स मध्ये मेट्रोला गर्दी असते त्यामुळे अशा परिस्थितीत दोन तास जरी मेट्रो बंद राहिली तरी त्याचा पूर्ण परिणाम इतर बस रिक्षा यांसारख्या साधनांवर होतो. गर्दी व्यवस्थापन देखील अशा परिस्थितीत जरुरी आहे"
- रश्मी वायंगणकर, ऑफिस एडमिन