पीएमसी गैरव्यवहार : भाजप नेत्याच्या मुलाला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

आरोपींची संख्या 9 वर 
रणजीत सिंग यांच्या अटकेमुळे पीएमसी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 9 वर पोहोचली आहे. यापूर्वी याप्रकरणी एचडीआयएलचे राकेश वाधवान व सारंग वाधवान, पीएमसीचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी संचालक वरियम सिंग, सुरजीत सिंग अरोरा व तीन लेखा परीक्षकांना अटक झाली होती. आरबीआयने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घातल्यापासून आतापर्यंत बॅंकेच्या 10 खातेधारकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र रणजीत सिंग याला "पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी शनिवारी (ता. 16) आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली. रणजीत हे बॅंकेच्या 12 संचालकांपैकी एक होते. 

याबाबत सहपोलिस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांना विचारले असता, त्यांनी रणजीत यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून अटक करण्यात आली. हा गैरव्यवहार झाला, त्या वेळी ते बॅंकेच्या रिकव्हरी समितीवर कार्यरत होते. त्यामुळे त्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. (डीएचएफएल)च्या थकीत कर्जाबाबतची माहिती असल्याचा आरोप आहे. त्यांना या गैरव्यवहाराबाबतची माहिती होती, तसेच गैरव्यवहारासाठी करण्यात आलेल्या बनावट नोंदींबाबतही माहिती असल्याचा आरोप आहे. शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी सुटीच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. 

आरबीआयने नेमलेल्या प्रशासकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे 4,355 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी बॅंकेच्या व्यवस्थापनातील थॉमस यांच्या जबाबाच्या आधारावर वित्त कर्ज देताना काही अनियमितता असल्याचे उघड झाले होते. ही अनियमितता 2008 नंतर दिसून आल्यामुळे तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान "ईओडब्ल्यू'पुढे आहे. याप्रकरणी भादंवि कलम 420 (फसवणूक), 406 (विश्‍वासघात), 409 (सरकारी अधिकाऱ्याकडून विश्‍वासघात), 465 (बनावटीकरण), 468 (फसवणुकीसाठी बनावटीकरण) व 120 (ब) (गुन्हेगारी कट रचणे) आदी कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरबीआयच्या ऍडमिनिस्ट्रेटोने याप्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी सुरू आहे. 

आरोपींची संख्या 9 वर 
रणजीत सिंग यांच्या अटकेमुळे पीएमसी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 9 वर पोहोचली आहे. यापूर्वी याप्रकरणी एचडीआयएलचे राकेश वाधवान व सारंग वाधवान, पीएमसीचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी संचालक वरियम सिंग, सुरजीत सिंग अरोरा व तीन लेखा परीक्षकांना अटक झाली होती. आरबीआयने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घातल्यापासून आतापर्यंत बॅंकेच्या 10 खातेधारकांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC scam : Former BJP MLA's son arrested