पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अखेर अटक

आरोपी महिला
आरोपी महिला

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी हुज्जत घालून कारवाईपासून रोखणाऱ्या प्रियांका राजेश मोगरे या महिलेविरोधात वाशी पोलिसांनी सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

८ ऑगस्ट रोजी प्रियांका मोगरे हिने वाशी सेक्‍टर १७ मध्ये पोलिसांशी गैरवर्तन केले होते. या प्रकारानंतर प्रियांकाने पोलिस ठाण्यात येऊन वाहतूक पोलिसांची माफी मागितल्याने पोलिसांनी तिला सोडून दिले होते; मात्र त्यानंतर तिने या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करून पोलिसांची बदनामी केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल झालेली प्रियांका मोगरे ही झोमॅटोच्या माध्यमातून फूड डिलीव्हरीचे काम करत असून ८ ऑगस्ट रोजी ती वाशी सेक्‍टर १७ मध्ये फूड डिलीव्हरी करण्यासाठी आली असता तिने आपली दुचाकी नो पार्किंग क्षेत्रात उभी केली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांनी तिच्या दुचाकीचा ई-चलन यंत्राद्वारे फोटो काढून कारवाई करण्यास सुरुवात केली होती; मात्र या गोष्टीचा राग आल्याने प्रियांकाने वाहतूक पोलिसाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन पळ काढला.

अन्य पोलिसांच्या मदतीने प्रियांकाचा पाठलाग करून तिला वाशीतील शिवसेंटर येथे अडवले होते; मात्र तिने वाहतूक पोलिसाचा मोबाईल फोन त्यांच्या अंगावर फेकून तेथून पुन्हा पळ काढला. त्यानंतर तिला पाम बीच मार्गावर अडवल्यावर तिथेही तिने शिवीगाळ केली. याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या व्यक्तीने पोलिसांचे मोबाईलवरून चित्रीकरण केले. या वेळी प्रियांकाने हे पोलिस गाडीजवळ असूनही फाईन मारत असल्याचे बोलून पोलिसांना शिवीगाळ केली.

माफी मागितल्यानंतर व्हिडीओ व्हायरल
प्रियांकाने सर्व पोलिसांची माफी मागितल्याने तिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून सोडून दिले; मात्र त्यानंतर तिने पोलिसांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे वाशी पोलिसांनी प्रियांकावर गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com