ठकसेन चंद्रशेखरचा पोलिस घेणार ताबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबईत किमान 500 जणांना 19 कोटींचा गंडा

मुंबईत किमान 500 जणांना 19 कोटींचा गंडा
मुंबई - निवडणूक चिन्हासाठी 50 कोटींची मागणी केल्याचा संशय असलेल्या एस. चंद्रशेखर याला आता मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखाही (ईओडब्ल्यू) पुन्हा अटक करणार आहे. दिल्ली पोलिसांकडून त्याचा ताबा घेण्यात येईल. मुंबईतील किमान 500 जणांना 19 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी "मद्रास कॅफे' चित्रपटाची अभिनेत्री लीना पॉल हिच्यासह चंद्रशेखरला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी दिल्लीला आल्याच्या संशयावरून एस. चंद्रशेखर याला दोन वर्षांपूर्वी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आपण तमिळनाडूतील खासदार आहोत, अशी बतावणी करणाऱ्या चंद्रशेखरने मुंबईतील किमान 500 जणांना 19 कोटींचा गंडा घातला होता. 2015 मध्ये याप्रकरणी अभिनेत्री लीना पॉल हिलाही अटक झाली होती. एप्रिल 2016 मध्ये चंद्रशेखरला जामीन मिळाला होता; पण त्या वेळी न्यायालयाने चार महिन्यांत 19 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. त्याने पैसे न भरल्याने डिसेंबर 2016 मध्ये त्याचा जामीन रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी कस्टडीनंतर त्याला पुन्हा अटक करून न्यायालयापुढे हजर केले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकच्या एका गटाला कथित स्वरूपात पक्षाचे दोन पानांचे चिन्ह मिळवून देण्यासाठी चंद्रशेखरने 50 कोटींची मागणी केली होती. त्यामुळे जामिनाची रक्कम भरण्यासाठी चंद्रशेखर ही रक्कम घेत होता का, याविषयीही तपास केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन चिन्ह मिळवून देण्यासाठी तो दिल्लीत आला होता, असा संशय आहे. एका पंचतारांकित हॉटेलमधून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्या सर्व दाव्यांची पडताळणी दिल्ली पोलिस करत आहेत. त्याच्याकडे पोलिसांना 6 कोटी 5 लाखांचे ब्रेसलेट, एक कोटी 30 लाखांची रक्कम आणि दोन महागड्या कार सापडल्या. दिल्ली पोलिसांनी चंद्रशेखरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: police arrested to s. chandrashekhar