मृत भिकाऱ्याजवळील संपत्ती मोजताना पोलिसांना फुटला घाम (Video)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

गोवंडी स्थानकापासून जवळच रेल्वेमार्गावर नाल्याच्या शेजारी झोपड्यात राहत असलेल्या पिरबीचंदचा रेल्वे रूळ ओलांडताना शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्याला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

मुंबई : मानखुर्द हार्बर मार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याकडे लाखो रुपयांची चिल्लर तसेच बँकेतील ठेवीची कागदपत्रे सापडली आहेत. चिल्लर मोजता मोजता पोलिसांचा घाम निघताना दिसत आहे. शुक्रवारी (ता. चार) रात्री रेल्वे अपघातात मृत झालेल्या भिकाऱ्याचे नाव पिरबीचंद आझाद (वय अंदाजे सत्तर)असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

गोवंडी स्थानकापासून जवळच रेल्वेमार्गावर नाल्याच्या शेजारी झोपड्यात राहत असलेल्या पिरबीचंदचा रेल्वे रूळ ओलांडताना शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्याला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात देण्याच्या उद्देशाने त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला. अपघात झालेल्या परिसरातच त्याची झोपडी असल्याचे कळले. पोलिसांनी पंचाच्या उपस्थितीत झोपडीमध्ये प्रवेश करत नातेवाईकांची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बँकेच्या ठेवीची कागदपत्रे सापडलीच पण सोबत सापडली नाण्यांनी नोटांनी भरलेली पोती. सर्व ताब्यात घेतल्यावर शनिवारी रात्रीपासून ती चिल्लर मोजायला सुरुवात केली. पोलिसांचा घाम काढणारी ही मोजणी रविवारी दुपारपर्यंत सुरु होती. दीढ लाखांपेक्षा अधिक ही चिल्लर असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ठेवीची रक्कम देखील आठ लाख सत्त्याहत्तर हजार आहे. भिकाऱ्याकडे सापडलेली ही लाखोंची संपत्ती पाहून पोलिस पण काही क्षण चक्रावून गेल्याचे दिसत होते. मिळालेल्या कागदपत्रांवर नोंद असलेल्या वारसांचा पोलीस शोध घेत असून, त्याचे मुळगाव राजस्थान असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. राजस्थानमधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करून पुढील निर्णय घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police counts assets on beggars in Mumbai