म्‍हसळ्यात पोलिसांचा अजब कारभार

म्‍हसळा : शासकीय गोदामामध्ये येणारा धान्याचा ट्रक अडकला.
म्‍हसळा : शासकीय गोदामामध्ये येणारा धान्याचा ट्रक अडकला.

म्हसळा (वार्ताहर) : म्‍हसळा शहरात गेल्‍या दोन दिवसांपासून वाहतुकीत पूर्वसूचना न देता बदल करण्‍यात आला आहे. त्‍याचा परिणाम येथील स्‍थानिक प्रवासी आणि नागरिकांवर होत आहे. पोलिस ठाण्‍यात गेल्‍यावर संबंधित अधिकारी नसल्‍याचे कारण पुढे करून तक्रार घेण्‍यास विलंब  अथवा टाळाटाळ करत असल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्याला ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ या प्रणालीअंतर्गत सेवा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते. तसेच, पोलिस ठाण्यात आलेले नागरिक समाधानी आहेत का, याचा सतत आढावा घेतला जातो. मात्र, केंद्रीय मंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची श्री धावीर मंदिर पटांगणात आज जाहीर सभा असल्‍याने पोलिस प्रशासनाने पूर्वसूचित न करता त्या परिसरातील मार्ग बदलले. अचानक बदललेल्या मार्गाचा स्थानिक नागरिकांना त्रास होत होता. तर काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतही वाहतूक कोंडी होत होती. याविषयी विचारणा करण्यास पोलिस ठाण्यात नागरिक, वाहनचालक गेले असता, पोलिस हवालदार एस. बी. मोरे यांनी संबंधित ठाणे अंमलदार नसताना अशा पद्धतीने विचारणे उचित नाही, अशी उत्तरे दिली. पोलिसांकडून मिळणाऱ्या या वागणुकीमुळे नागरिक हताश झाले आहेत. त्यामुळे म्हसळा पोलिस ठाण्यात या प्रणालीचा योग्य वापर होत आहे की नाही? याबद्दल नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.

रामदास आठवले यांच्या सभा ठिकाणाच्या परिसरात प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमिक शाळा आणि मंदिरे असा सार्वजनिक वापराचा परिसर आहे. मात्र, या सभेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. 

व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ या प्रणालीअंतर्गत सेवा उपक्रम ही प्रणाली श्रीवर्धन उपविभागातील तिन्ही पोलिस ठाण्यात सुरू आहे. त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते. तसेच, पोलिस ठाण्यात आलेले नागरिक समाधानी आहेत का, याचा सतत आढावा घेतला जातो.
- बापूसाहेब पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीवर्धन

पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने वागा. आस्थेने चौकशी करून धीर द्या. त्यांची तत्काळ तक्रार दाखल करू घ्या, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले जातात. एखादी महिला, ज्येष्ठ नागरिक सहज पोलिस ठाण्यात जाऊ शकतील, असे वातावरण पोलिस ठाण्यात झाले पाहिजे.
- रामचंद्र म्हात्रे, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com