लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नगरसेवकाची होणार चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील गावी विविध वाहनांनी ये-जा करणे नेरूळ-जुईनगरमधील एका शिवसेनेच्या नगरसेवकाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील गावी विविध वाहनांनी ये-जा करणे नेरूळ-जुईनगरमधील एका शिवसेनेच्या नगरसेवकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या नगरसेवकाला तत्काळ होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी सहायक पोलिस उपायुक्तांमार्फत संबंधित नगरसेवकाच्या प्रवासाची चौकशी सुरू केली आहे. 'शिवसेना नगरसेवकाचा चकवा?' या मथळ्याखाली 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. 

मोठी बातमी ः लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कॉन्फरन्समध्ये झाली 'या' मुद्द्यांवर चर्चा

नेरूळ-जुईनगरमध्ये शिवसेनेचा नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात या नगरसेवकाने खासगी वाहनाने त्याच्या कुटुंबीयांना पुण्यातील गावी सोडून आल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. त्यानंतर हा नगरसेवक कीटक फवारणी पंप, भाजी अशा विविध कारणांमुळे गावी ये-जा करीत होता. प्रभागात नेहमी दिसणारा हा नगरसेवक अचानक अधूनमधून गायब होण्यास सुरुवात झाल्यामुळे जुईनगरमध्ये सोशलमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पुणे जिल्ह्यात ये-जा असल्यामुळे प्रवासादरम्यान कोरोनाबाधिताशी संबंध आला असल्यास आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून या नगरसेवकाची रहिवाशांमध्ये दहशत पसरली होती. याबाबत २७ एप्रिलला 'सकाळ'ने 'शिवसेना नगरसेवकाचा चकवा?' अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित केल्यावर सरकारी यंत्रणांनी चौकशीची चक्रे फिरवली आहेत. हा नगरसेवक नेमका कोणत्या तारखांना गावी जाऊन आला. जाताना कोणत्या वाहनांचा उपयोग केला. केलेला प्रवास परवानगीने केला की विनापरवानगी अशी सर्व चौकशी नवी मुंबई पोलिसांनी सुरू केल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज डाहणे यांनी दिली. 

महत्वाची बातमी ः तिने फेसबुकवर कमेंट केली आणि पुढे काय झालं..?

आता होम क्वारंटाईन होणार
लॉकडाऊनच्या काळात गावी ये-जा केली अथवा नाही, तसेच ती परवानगीने केली की विनापरवानगी याचा तपास पोलिस करीत आहेत; मात्र जर प्रवास केला असेल तर इतर रहिवाशांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रथामिक खबरदारी म्हणून महापालिकेने संबंधित नगरसेवकाला होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहे. नगरसेवकाने घरातच राहून स्वतःला विलगीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police enquiry by police to shivsena corporator in navi mumbai