पोलिसांची दस्तुरी येथे धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दस्तुरी येथे फसवणूक आणि दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी माथेरान नगरपालिकेत आल्या होत्या. त्यावर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

माथेरान (बातमीदार) : माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दस्तुरी येथे फसवणूक आणि दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी माथेरान नगरपालिकेत आल्या होत्या. त्यावर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत तक्रारीत तथ्य असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दस्तुरी येथील घोडेवाले, हातरिक्षावाले, एजंट आणि कुली यांच्यावर कारवाई केली.

दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, मिनी ट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली हे येथे आलेल्या पर्यटकांची फसवणूक करत होते. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल फार मोठ्या प्रमाणात होते, हे त्यांच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आले. त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांना पत्र लिहून येथील फसवणूक थांबवण्यासाठी कारवाई करण्यासंदर्भात लेखी स्वरूपात सांगितले. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र राठोड, पोलिस शिपाई राहुल मुंढे, राहुल पाटील, प्रशांत गायकवाड, होमगार्ड हरीश तिटकारे, यशवंत थोराड, सचिन पारधी यांच्या पथकाने मंगळवार व बुधवारी धडक कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली यांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाईदरम्यान घोडेवाल्यांना पोलिसांचे दिलेले नमदा क्रमांकाची मंकी पॉईंट येथे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन घोडे हे नमदा नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार घोडेमालकांवर कारवाई करण्यात आली. एका घोडेवाल्याने तर चक्क चार घोड्यांचे आठ हजार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या पर्यटकाला पोलिसांनी एक घोड्याचे ११०० प्रमाणे दर घेऊन बाकीचे पैसे परत केले.

मंगळवारच्‍या कारवाईनंतरही बुधवारी तीच स्थिती होती. घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली आलेल्या खासगी वाहनांच्या मागे धावतानाचे चित्र बुधवारी दुपारचे होते. त्‍या वेळी पोलिसांनी त्यांना पार्किंगमध्ये येण्यास मज्जाव केला आणि पार्किंगच्या बाहेर पर्यटकांना सेवा द्यावी, असे सांगितले. पण, काही जण अरेरावी करत असल्याने त्यांचा घोडा परवाना, पासिंग क्रमांक घेऊन त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

मी मंकी पॉईंट येथे गेले, त्या वेळी पोलिस कारवाई करताना दिसले. तेथे एका घोडेवाल्याने एका घोड्यासाठी दोन हजार रुपये घेतल्‍याचे पाहून हैराण झाले. घोडेवाला अश्वपाल संघटनेचा असून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे.
- आशा कदम, अध्यक्ष, स्थानिक अश्वपाल संघटना

दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक होते, अशा तक्रारी वारंवार येत होत्या. या फसवणुकीमुळे येथील पर्यटक संख्याही रोडावली होती. पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वागतार्ह आहे. यामुळे पर्यटक मोकळ्या मनाने येथील पर्यटनाचा स्वच्छंद आनंद घेऊ शकतो.
- राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police has taken action on horserider, riksha at Matheran