भिवंडीतील पोलिस गायब?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

भिवंडी शहरातील अंजूरफाटा, कोटरगेट मशीद रोड, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, कासार आळी, नवी चाळ आदी विविध चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांची ड्युटी लावली जाते; मात्र चौकांमध्ये पोलिसच नसल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागते.

भिवंडी : भिवंडी शहरातील अंजूरफाटा, कोटरगेट मशीद रोड, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, कासार आळी, नवी चाळ आदी विविध चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांची ड्युटी लावली जाते; मात्र चौकांमध्ये पोलिसच नसल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागते.

शहरातील वंजारपट्टी नाका, धामणकर नाका, प. अण्णासाहेब जाधव व बी. एन. एन. महाविद्यालयासह पोलिस उपायुक्त कार्यालय, तहसीलदार, पालिका मुख्य कार्यालयासमोर दररोज अवजड वाहनांची मोठी कोंडी होते. या कोंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांचीही भर पडत आहे. परिसरातील वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्यामुळे ही कोंडी होत असून, नागरिकांनी प्रवास करायचा तरी कसा, असा प्रश्‍न महापौर जावेद दळवी यांनी पोलिसांसोबत पार पडलेल्या बैठकीत केला.

ठाणे पोलिस आयुक्तांनी शहरात अवजड वाहनांना बंदी केली असताना शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची सर्रास वाहतूक होते. याबाबत महापौर जावेद दळवी यांच्यासह माजी सभापती प्रदीप राका, सभागृह नेते प्रशांत लाड, नासिर सैय्यद आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.  पोलिस व पालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रिक्षाचालकांचा अडथळा
रिक्षाचालक आनंद दिघे चौक, स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार, भिवंडी एसटी स्टॅंड चौक, भादवड नाका, गौरीपाडा, ठाणगे आळी (जुना वाडा स्टॅण्ड), पारनाका बाजारपेठ अशा विविध ठिकाणी रस्त्यावर रिक्षाचालक बेकायदा रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. 

शहरातील अशोक नगर, कल्याण रोड, पारनाका आदी ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीतून वाहनचालक, नागरिकांची सुटका होण्यासाठी पोलिसांनी याप्रकरणी विशेष लक्ष घालावे.
- जावेद दळवी, महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police missing in Bhiwandi?