खाकीतली माया ! लॉकडाऊनमध्ये 'त्या' आजीच्या मदतीला धावून गेले पोलीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे फारच हाल होत आहेत. परस्वाधिन असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरीकांच जगणेच उतारवयात लॉकडाऊन झाल्याची अनुभूती येत आहे.

ठाणे : लॉकडाऊनमुळे शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे फारच हाल होत आहेत. परस्वाधिन असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरीकांच जगणेच उतारवयात लॉकडाऊन झाल्याची अनुभूती येत आहे. ठाण्यातील अशाच एका घरात बाथरूममध्ये पडून उपचाराअभावी खितपत पडलेल्या 85 वर्षीय आजीबाईसाठी नौपाडा पोलीस देवदुताप्रमाणे धावून गेले. पोलिसांनी तातडीने प्रथमोपचार करून डॉक्टरांना पाचारण केल्याने त्या आजीही सुखावल्या आहेत.

नक्की वाचा : कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

लॉकडाऊन काळात तर, अहोरात्र रस्त्यावर राबूनही पोलीस फटकेबाजीसाठीच बदनाम झाले आहेत. अशात पोलिसांमधील ज्येष्ठांप्रती असलेला मायेचा ओलावा दाखवणारी बाब समोर आली आहे. ठाण्यातील चरई परिसरात शिवसेना शाखेजवळील इमारतीत आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या मुलीसोबत राहणाऱ्या 85 वर्षीय प्रेमा कल्लीहाल आठवडयापुर्वी घरातील बाथरूममध्ये पडून जखमी झाल्या होत्या. अनेक दिवस त्यांना उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध होईना. त्यांची एक मुलगी बेंगलोरला असून जावई नेव्हीमध्ये आहेत. त्यांनी याबाबत सोशल मिडियात मदतीचे आवाहन केले होते. ही बाब नौपाडा पोलिसांच्या कानावर येताच, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विनोद लबडे व सहकारी गुरूवारी सायंकाळी आजीबाईच्या घरी पोहचले आणि विचारपूस करून तातडीची औषधे आणून देत शुक्रवारी सकाळी डॉक्टरानाही पाचारण केल्याने आजीबाईवर उपचार सुरू झाले आहेत.

मोठी बातमी : बापरे ! धारावीत नवे 25 कोरोना रुग्ण. कोरोनाची ही चेन तुटणार तरी कधी ? 

लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी सामाजिक भावनेतुन एकमेकांच्या मदतीला
धावून जाणे गरजेचे आहे. अखेरचा, पर्याय म्हणजे 'पोलीस' आहेत. तरीही, अशा अडचणींची माहिती मिळाली की, त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे वरिष्ठांचे निर्देश असल्याने आपण कर्तव्य बजावले आहे.
- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नौपाडा.

The police rushed to the aid of that grandmother in the lockdown

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police rushed to the aid of grandmother in the lockdown