पोलिस खबऱ्याचा मॉडेल तरुणीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

कुर्ला येथे पोलिसांच्या छाप्यात बचावलेल्या 28 वर्षीय मॉडेलवर खबऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबई : कुर्ला येथे पोलिसांच्या छाप्यात बचावलेल्या 28 वर्षीय मॉडेलवर खबऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. 

महत्वाची बातमी ः मुंबई - अलिबाग रो-रो सेवा मार्चपर्यंत

मूळची मध्य प्रदेशची असलेली 28 वर्षीय तरुणी दोन वर्षांपूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती. अंधेरीतील मरोळ परिसरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या तरुणीला 4 फेब्रुवारीला रात्री एका व्यक्तीने साकीनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी बोलावले. तरुणी हॉटेलवर आली, त्या वेळी आणखी दोन तरुणी तेथे उपस्थित होत्या. दरम्यान, त्याच वेळी हॉटेलवर पोलिसांचा छापा पडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मॉडेलसह तीनही तरुणी गोंधळल्या; मात्र पोलिसांना या ठिकाणी काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने पोलिसांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तिघींचे जबाब नोंदवून त्यांना सोडून दिले. 5 फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.

महत्वाची बातमी ः "धन, बल और छल हार गया, विकास और विश्वाश जीता" - नवाब मलिक

दरम्यान, पोलिसांच्या छाप्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिस खबऱ्याने मॉडेल तरुणीला धीर दिला. "माझ्यामुळे तू वाचलीस; नाहीतर तुझे काही खरे नव्हते,' असे सांगून खबऱ्या तिला जेवण्यासाठी कुर्ला पश्‍चिमेच्या कल्पना सिनेमागृहानजीक घेऊन आला. जेवणानंतर सकाळी जा, असे सांगून तिला नजीकच्या हॉटेलवर आणले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने सकाळी थेट साकीनाका पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून जोहेब नामक पोलिस खबऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सदर घटना विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police source person raped on model