मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कृष्णकुंज, ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

राज ठाकरे यांची आज (गुरुवार) चौकशी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवार) चौकशी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी राज ठाकरे यांची 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 'ईडी' कार्यालय आणि मुंबईत मनसेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमण्याच्या शक्‍यतेने राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा शांततेचे आवाहन केले आहे. 

कोहिनूर मिलप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची आज सलग तिसऱ्या दिवशी 'ईडी'ने चौकशी केली. तसेच, त्यांच्या कंपनीतील भागीदार राजन शिरोडकर यांचीही चौकशी करण्यात आली. 

राज यांना 'ईडी'ने नोटीस पाठविल्यापासून मनसेतील वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासूनच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यास सुरवात केल्यामुळे राज यांनी शांततेचे आवाहन केले आहे. मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. राज यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त असून, मराठवाड्यातून आलेल्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police takes action against MNS Party Workers on the day of Raj Thackeray ED inquiry