शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या भेटीने बदलापूर नगरपालिका वर्तुळात चर्चा 

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या भेटीने बदलापूर नगरपालिका वर्तुळात चर्चा 

बदलापूर - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे बदलापूरमध्ये अचानक आल्याने बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याला दोन आठवडे उलटल्यानंतरही नगराध्यक्षा विजया राऊत यांनी राजीनामा दिला नसल्याने सेनेच्या एका गटात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाप्रमुखांनी नगराध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजते. नगराध्यक्षा विजया राऊत यांचा सव्वावर्षाचा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला आहे. शिवसेनेतील दोन गटांपैकी एका गटाकडून विजया राऊत यांना पाठिंबा असल्याने त्यांनाच नगराध्यक्षपदी कायम ठेवण्याची त्या गटाची मागणी आहे. दुसरा गट नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. दोन आठवड्यापूर्वी उपनगराध्यक्ष सुनील भगत यांनी राजीनामा दिला होता. त्या माध्यमातून नगराध्यक्षांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला; मात्र त्यानंतरही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने शिवसेनेतील एका गटाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे नियोजन असतानाच जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सकाळी शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांच्या कार्यालयात भेट दिली. जिल्हाप्रमुख आल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नेते, शहप्रमुख आणि सर्व नगरसेवकांनी श्रीधर पाटील यांच्या कार्यालयात धाव घेतली. या वेळी नगराध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. त्यावर नगराध्यक्षांकडून होकारही दिल्याचे समजते. 

आपण नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्यासाठी आलो नव्हतो. नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यांनी निर्णय घेतल्यावर पदाधिकारी अंमलबजावणी करीत असतात. मंगळवारी शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांच्या कार्यालयात आलो होतो. या वेळी कोणतीही बैठक घेतली नाही किंवा कोणाला बोलावले नव्हते. पक्षात कोणतीही गटबाजी नाही. 
- प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे मंगळवारी बदलापूरमध्ये आले होते; मात्र नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पक्षश्रेष्ठी ज्या वेळी राजीनामा देण्याचा आदेश देतील, त्या वेळी नगराध्यक्षा लगेच राजीनामा देतील. 
- शितल राऊत, ज्येष्ठ नगरसेविका, शिवसेना 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com