esakal | पोहरादेवी शक्तीप्रदर्शनामुळे महिलांनी घेतला शिवसेनेचा धसका; भाजप मुंबई महिला मोर्चाची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

पोहरादेवी शक्तीप्रदर्शनामुळे महिलांनी घेतला शिवसेनेचा धसका; भाजप मुंबई महिला मोर्चाची टीका

शिवसेनेत नव्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतरची ही संस्कृती आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे.

पोहरादेवी शक्तीप्रदर्शनामुळे महिलांनी घेतला शिवसेनेचा धसका; भाजप मुंबई महिला मोर्चाची टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई - पोहरादेवी येथे काल झालेल्या बेमुर्वतखोर शक्तीप्रदर्शनामुळे राज्यातील महिलांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. शिवसेनेत नव्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतरची ही संस्कृती आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी लगावला आहे.

पोहरादेवी येथील या प्रकाराबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीमती देसाई यांनी वरीलप्रमाणे मतप्रदर्शन केले आहे. 

अजाणतेपणी किंवा जाणुनबुजून चूक झाल्यावर ती कबूल करून क्षमा मागून प्रायश्चित्त घेणे हेच खऱ्या माणसाचे लक्षण आहे. त्याऐवजी तो मी नव्हेच अशा प्रवृत्तीने प्रसारमाध्यमांनाच दोष देऊन उर्मटपणे शक्तीप्रदर्शन केल्याने नागरिक घाबरणारच, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे. विशेष म्हणजे शिवसेनेचे हे बदललेले रुप प्रामुख्याने महिलांना धडकी भरवणारे आहे, अशीही टीका श्रीमती देसाई यांनी केली आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

माझे वडील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेचे आमदार होते. तेव्हा सामान्य महिलांना शिवसेना नेत्यांबद्दल तसेच शिवसैनिकांबद्दल आदर होता. महिला विश्वासाने त्यांच्याकडे कामांसाठी जात असत व त्या विश्वासाला केव्हाही तडा गेला नव्हता. आता तशी हिंमत कोणी दाखवेल का, याबाबत माझ्या मनात शंका आहे. जुन्या काळातले शिवसैनिक आक्रमक होते. आता शिवसैनिकांमधील ती आक्रमकता निघून गेली आहे ही नवी शिवसेना आहे, असा टोलाही श्रीमती देसाई यांनी लगावला. 

शिवसेना पहिल्यापासून राडेबाजीसाठी आणि आता भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्त्रियांच्या फसवणुकीचा शिवसैनिकांचा लौकिक यापूर्वी कधीच नव्हता. उलट शिवसैनिक पूर्वी स्त्रीयांचे रक्षण करीत असत, मात्र आता महिलांची फसवणुक ही नवी ओळख शिवसैनिकांना मिळाल्याबद्दल अभिनंदन, अशा शब्दांत श्रीमती देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. 

यापुढे मतदान करताना महिला या गोष्टीचा नक्कीच विचार करतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या राज्यात इतके दिवस महिला गुंडांपासून सुरक्षित नव्हत्या. आता या अशा तरुण नेत्यांपासूनही स्वसंरक्षण ही नवी जबाबदारी महिलांवर येऊन पडली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणुकीशी शिवसेनेची ही नवी संस्कृती पूर्णपणे विसंगत आहे. आघाडीतील इतर पक्षांच्या तरुण नेत्यांनीही अशा प्रवृत्तीपासून सावध रहावे, असाही इशारा श्रीमती देसाई यांनी दिला आहे.

-------------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

political news marathi BJP Mumbai Mahila Morcha criticizes Shiv Sena mumbai pooja chavhan