esakal | बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय पक्ष सरसावले
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय पक्ष सरसावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivali) १५ वर्षीय मुलीवर २९ जणांनी अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिस (Police) ठाण्यात धाव घेतली. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, भाजपच्या (BJP) चित्रा वाघ (Chitra Wagh) व मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पोलिसांची (Police) भेट घेत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.

आरोपींना ताब्यात द्या, त्यांची धिंड काढू : विद्या चव्हाण, राष्ट्रवादी नेत्या
पोलिस त्यांचे काम चोखपणे करीत आहेत. दिल्ली प्रकरणानंतर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकर निकाल लावले जातात; मात्र आरोपींना शिक्षेचाही धाक राहिलेला नाही. गुन्हे करणाऱ्या आरोपींना महिलांच्या ताब्यात द्या, त्यांची गाढवावरून धिंड काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. राजकीय पक्षातील काही जणांच्या मुलांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत चव्हाण म्हणाल्या की, आरोपींना कोणत्याही पक्षाचे अभय मिळणार नाही.

विशेष अधिवेशनाची मागणी योग्य : भाजप नेत्या चित्रा वाघ
डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर झालेली सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष महिला अधिवेशन भरविण्याची भाजपची मागणी योग्य होती. अजून किती महिलांवर बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येणार, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. बलात्काराच्या घटना राज्यात वारंवार घडत आहेत. या घटना पाहता आता सांगा संजयजी थोबाड कोणाचे फोडायचे. सरकारचे फोडायचे की विरोधी पक्षाचे, असा सवालही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला.

हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीत 3 लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण

शक्ती कायद्यावर चर्चेसाठी सरकारला वेळ नाही : राजू पाटील, आमदार, मनसे
कल्याण ग्रामीण हद्दीत दिवा येथे एक व मानपाडा हद्दीत दोन पोलिस ठाणी व्हावीत म्हणून सातत्याने पाठपुरावा करत आहे. मनुष्यबळ कमी असल्याचे पोलिसांनीही आज मान्य केले आहे. २०१९ ला हिवाळी अधिवेशनात दिशा कायद्याचा मुद्दा मांडला होता. नंतर कोरोना काळात अधिवेशनच झाले नाही. शक्ती कायद्याचा मसुदाही तयार आहे; पण त्यावर चर्चा करण्यास सरकारला वेळ नाही. आता तरी सरकारचे डोळे उघडून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

loading image
go to top