मुंबईतील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इच्छुक उमेदवार नागरिकांच्या घरीदारी जात आहेत. गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे. जनसंपर्क वाढवण्यासाठी उटण्याचे वितरण केले जात आहे. जवळच्या कार्यकर्त्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जात आहेत. पक्षांची कार्यालयेही सणाच्या निमित्ताने गजबजली आहेत

मुंबई -  मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी दिवाळीचा मुहूर्त साधून जनसंपर्काचा धूमधडाका सुरू केला आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू आहे. पक्षांची कार्यालयेही गजबजून गेली आहेत. तेथील वातावरणात निवडणुकीचा उत्साह संचारला आहे.

प्रभागांची आरक्षणे जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमदेवारांची चाचपणी सुरू केली. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी आहे. प्रभागांची फेररचना आणि आरक्षणांमुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे अडचणी निर्माण झाल्या. त्या दूर करण्यासाठी त्यांनी लगेचच उमेदवारांची चाचपणी सुरू केली. या पार्श्‍वभूमीवर दिवाळीच्या मुहूर्तावर इच्छुकांनी आपली छबी असलेले बॅनर आणि होर्डिंग लावून मतदारांवर दिवाळी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इच्छुक उमेदवार नागरिकांच्या घरीदारी जात आहेत. गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे. जनसंपर्क वाढवण्यासाठी उटण्याचे वितरण केले जात आहे. जवळच्या कार्यकर्त्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जात आहेत. पक्षांची कार्यालयेही सणाच्या निमित्ताने गजबजली आहेत. कार्यकर्ते निवडणुकीसाठी आतापासूनच सक्रिय झाले आहेत. काही राजकीय पक्षांनी यापूर्वीच सदस्य नोंदणी सुरू केली आहे. आता दिवाळीतही हे काम वेगाने सुरू आहे.

Web Title: Politicians hasten for BMC election