सर्वात गरीब आमदार पालघरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

विरार ः डहाणू मतदारसंघातील माकपचे उमेदवार आणि आमदारकी मिळवण्यात यशस्वी झालेले विनोद निकोले पुन्हा एकदा या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राज्यात निवडून आलेला सर्वात गरीब आमदार म्हणून त्यांचे नाव पुढे आले असून त्यांनी पैशांशिवाय विद्यमान आमदाराचा केलेला पराभव यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

विरार ः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांची संपत्ती कोट्यवधीच्या घरात निघाली. त्यांनी आयोगाकडे सादर केलेल्या दिलेल्या माहितीवरूनच हे सिद्ध झाले. त्यामुळे निवडणुकीदरम्यान सर्वात श्रीमंत उमेदवारांची चर्चा चांगलीच रंगली. कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या उमेदवारांमध्ये विद्यमान आमदारांचीच संख्या अधिक होती. 

आता मात्र निवडणुकीनंतर सध्या वेगळीच चर्चा रंगली असून डहाणू मतदारसंघातील माकपचे उमेदवार आणि आमदारकी मिळवण्यात यशस्वी झालेले विनोद निकोले पुन्हा एकदा या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राज्यात निवडून आलेला सर्वात गरीब आमदार म्हणून त्यांचे नाव पुढे आले असून त्यांनी पैशांशिवाय विद्यमान आमदाराचा केलेला पराभव यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

डहाणू विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे लढलेले माकपचे विनोद भिवा निकोले निवडून आले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या डहाणू मतदारसंघात कॉ. निकोले यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांचा चार हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. यावरून केवळ पैशांच्या जोरावर राजकारण करता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार निकोले यांनी नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी नेहमी संघर्षाची भूमिका घेतल्याने त्यांनी त्यांना निवडले आहे. स्वतःच्या पोटापाण्यासाठी निकोले हे डहाणू येथील इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्‍सच्या आवारात टपरी टाकून चहा आणि वडापावची विक्री करतात. 

एस.वाय.बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या निकोले यांना समाजसेवेची पहिल्यापासून आवड होती. याच चहा टपरीवर माकपचे ज्येष्ठ कॉम्रेड एल. बी. धनगर यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आणि त्यांनी त्यांना माकपमध्ये आणले. २००३ पासून ते माकपमध्ये काम करतात. २००६ पासून ते माकपचे पूर्ण वेळ सदस्य होते. ५०० रुपये मानधनावर त्यांनी माकपचे पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून त्यात विजयही संपादित केल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 

re>

मोलमजुरीवर झाले शिक्षण
डहाणू तालुक्‍यातील कासा येथून १० किलोमीटर अंतरावर दुर्गम खेडेगावातील गरीब आदिवासी तरुणही विधानसभेत जाऊ शकतो, हे विनोद निकोले यांनी दाखवून दिले आहे. सध्याच्या निवडणुकांमध्ये पैसा, संपत्ती हा महत्त्वाचा फॅक्‍टर असतो. डहाणूत मात्र पैसा, संपत्ती अपवाद ठरले आहेत. निकोले यांचे मूळ गाव डहाणू तालुक्‍यातील उर्से हे आहे. निकोले यांना आई-वडिलांनी मोलमजुरी करून शिकविले. उर्से येथे त्यांचे आईबाबा लहानशा घरात राहून शेती करत आहेत; तर निकोले सध्या डहाणू येथील बोर्डी येथील खेड्यात राहत आहेत.

स्वतःचे घरही नाही!
माकपचे विनोद निकोले यांच्याकडे एकूण ५१ हजार ८२ रुपये एवढी रोकड असून त्यांना राहायला स्वतःच्या मालकीचे घरदेखील नाही. आदिवासींचे प्रश्‍न, समस्या सोडवण्यासाठी आपण विधानसभेत आलो आहोत, असे विनोद निकोले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The poorest MLAs in Palghar