कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

मिलिंद तांबे
Tuesday, 27 October 2020

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. या देशांवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली.

मुंबई : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. या देशांवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. मुंबईत देखील नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही दुसरी लाट आली तर तिचा सामना करण्याची तयारी पालिकेच्या आरोग्य विभागाने केली असून 50 हजार अतिरिक्त खाटा, आयसीयू तसेच ऑक्‍सिजन खाटांची तयारी करण्यात आली आहे. 

हेही वाचा - कंगनाच्या अडचणी वाढणार? कंगनावर कारवाईसाठी वकिलांचे महाधिवक्त्यांना पत्र

पालिकेची नायर, केईएम आणि लोकमान्य टिळक हे तीन मोठी रूग्णालय आहेत. या रूग्णालयांत कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर उपचार केले जातात. यातील नायर रुग्णालय हे कोविड समर्पित रूग्णालय असून, त्यास देशातील पहिले कोविड मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा मान ही त्याला मिळाला आहे. कोविड मातांच्या प्रसूतीसाठी देखील हे रुग्णालय अव्वल ठरले आहे. दुसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता पालिकेने कोविड चाचण्या तसेच कोविड काळजी केंद्रातील खाटांची संख्या देखील वाढवली आहे. कोविड रूग्णांसाठी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 46,677 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील 19,629 खाटांवर रूग्ण उपचार घेत आहेत. येथील 27,048 खाटा रिक्त आहेत. तर कोविड काळजी केंद्र 2 मध्ये एकूण 23,806 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यातील 5,709 खाटांवर रूग्ण उपचार घेत असून, 18,097 खाटा रिक्त आहेत. एकूण खाटांपैकी 2,035 आयसीयू खाटा असून त्यातील 1,590 खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर 445 खाटा रिक्त आहेत. 9253 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यातील 4,668 खाटांवर रूग्ण उपचार घेत आहे. तर 4,585 खाटा रिक्त आहेत. ऑक्‍सीजन खाटांची संख्या 1,177 असून, त्यातील 978 खाटांवर रूग्ण उपचार घेत आहे. तर 199 खाटा रिक्त आहेत. 

हेही वाचा - युट्यूबवर व्हिडीओ पाहून थेट एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महत्त्वाच्या रूग्णालयातील तयारी 
- एकूण 2,450 खाटा 
- नायर रुग्णालयातील एकूण खाटा - 650 (त्यापैकी 50 आयसीयू खाटा) 
- केईएम रुग्णालयातील एकुण खाटांची संख्या - 1000 (यातील 300 खाटा, 100 आयसीयू नॉन कोविडसाठी तर 500 खाटा व 50 आयसीयू कोविड रूग्णांसाठी) 
- लोकमान्य टिळक रूग्णालयतील एकुण खाटांची संख्या - 800 (यातील 150 खाटा व 60 आयसीयू नॉन कोविड तर 530 खाटा व 60 आयसीयू कोविड रूग्णांसाठी) 

 

रूग्णवाढीचा दर अर्ध्या टक्‍क्‍यावर 
मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सध्या 132 दिवसांवर गेला आहे. 24 विभागांपैकी 23 विभागातही हा कालावधी 100 दिवसांवर गेला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे. तर कोविड रूग्णवाढीचा दर 0.53 इतका आहे. 

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. कोविड रूग्णांसाठी अतिरिक्त खाटा, आयसीयू तसेच ऑक्‍सिजन खाटांची व्यव्यस्था करण्यात आली असून, 500 डॉक्‍टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात वॉर रूम तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे. 
- डॉ. रमेश भारमल,
संचालक, पालिका समूह रूग्णालय 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of a second wave of corona Preparation of 50 thousand beds from BMC