वरळीच्या NSCI या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनामुक्त रूग्णांसाठी पोस्ट कोव्हिड ओपीडी

भाग्यश्री भुवड
Monday, 7 September 2020

वरळीच्या एनएससीआय या कोविड सेंटर मध्ये कोरोनामुक्त रूग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. शिवाय, डॉक्टरांकडून या रुग्णांसाठी फिजिओथेरेपीचे ऑनलाईन क्लासेस ही दिले जात आहेत. 

मुंबई: वरळीच्या एनएससीआय या कोविड सेंटर मध्ये कोरोनामुक्त रूग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. शिवाय, डॉक्टरांकडून या रुग्णांसाठी फिजिओथेरेपीचे ऑनलाईन क्लासेस ही दिले जात आहेत.  गेल्या आठवड्याभरापासून ही पोस्ट कोविड ओपीडी या सेंटरमध्ये सुरु करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोविडच्या उपचारानंतर ही बरे वाटत नाही किंवा श्वास घेण्यास त्रास होतो अश्या रुग्णांसाठी ही ओपीडी उपयुक्त ठरत असल्याचे एनएससीआय कोविड सेंटरच्या प्रमुख डाॅ. निता वर्टी यांनी सांगितले आहे. 

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

कोविड रुग्णांना बरे झाल्यानंतरही फुप्फुसाचा फायब्रोसिस हा आजार होत आहे. शिवाय, मानसिक ताण आणि शरीराला थकवा जाणवतो अश्या तक्रारी बरे झालेले रुग्ण करत आहेत. अश्या रुग्णांना डिस्चार्जच्या 10 दिवसानंतर या पोस्ट कोविड ओपिडीत बोलावले जात आहे. 

शिवाय, ऑनलाईन घेतल्या जाणार्या सत्रात फुप्फुसाचे व्यायाम प्रकार शिकवले जात आहेत. पालिका प्रमुख रुग्णालयांमध्ये या पूर्वीच पोस्ट कोविड ओपीडी सुरु  करण्यात आले असले तरीही या कोविड सेंटर मधील रिहॅब सेंटर ही महत्वाची बाजू असल्याचे येथील डॉ. वर्टी यांनी सांगितले. 

वरळी येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

कोविड 19 मधून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत. अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास, धाप लागणे, अंगदुखी असे त्रास होत आहे. त्यासाठी मुंबईत पालिकेकडून ठीकठिकाणी पोस्ट ओपीडी सेंटर सुरु करण्यात आले आहेत. वरळी येथील पोस्ट कोव्हीड रिहॅब सेंटर मुळे फायब्रोसिस कमी प्रमाणात होत आहेत. यात प्रत्येक रुग्णाला फुफुसाचे व्यायाम दिले जात आहे. प्रत्येक डॉक्टर 10 रुग्ण हाताळत असल्याचे येथील केंद्र प्रमुख डाॅ. निता वर्टी यांनी सांगितले. प्रत्येक रुग्ण या व्यायामाचा सराव करत आहे.

वाढत्या संसर्गामुळे पॅरोल अर्जावर तातडीने निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे कारागृह प्रशासनांना निर्देश

दहा दिवसांनी त्याची पुन्हा तपासणी होते. त्यानंतर पुन्हा महिनाभराने तपासणी होते. गेल्या दोन आठवड्यापासून घरी गेलेल्या रुग्णांना रिहॅब शेड्युल तयार करण्यात आले आहे. ओपीडीत आलेल्या रुग्णाना तपासले जाते. त्यांचे एक्सरे, ऑक्सिजन पातळी व इतर तपासणी केली जाते. यावेळी फायब्रोसिस होऊ नये म्हणून व्यायाम सांगितले जातात. यावेळी फिजिशियन शी चर्चा करून गरज पडल्यास स्टेरॉइड दिले जाते. ही ओपीडी ऑनलाईन सुरु आहे. यात इथून गेलेल्या प्रत्येक रुग्णाला दहाव्या दिवशी बोलावले जात आहे. यात डॉ. पंकज नार्वेकर, डॉ सुशांत पगारे, डॉ अनन अल्वानी, डॉ. सायली सावंत याच्या नियंत्रणाखाली या ओपीडी सुरु आहेत.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post Covid OPD for Corona Free Patients at NSCI Covid Center, Worli