पोस्टमन घरी येताच पेन्शनर झाले भावूक!

pansan
pansan

अलिबाग : कोरोनाचा अटकाव होऊ नये यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. मात्र या काळात केवळ पेन्शनवर जीवन जगणाऱ्या निवृत्त नागरिकांना पेन्शन घेणे अडचणीचे झाल्याने ती मोठी चिंता बनली होती. मात्र या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचे काम रायगड पोस्टाने केले असून रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 141 निवृत्तीवेतनधारकांना 25 लाखांचे घरपोच निवृत्तीवेतन देत या विभागाने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
वयस्कर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग लवकर होत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याने त्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. निवृत्तीवेतन घेत असलेल्या व्यक्तीला लॉकडाऊनकाळात निवृत्तीवेतन घेण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अडचणीचे ठरले होते.

त्यावर उपाय शोधत जिल्हा डाक अधिक्षक उमेश जनवाडे यांनी पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून या सर्व ज्येष्ठ मंडळींना निवृत्तीवेतनाची रक्कम घरपोच देण्याची योजना राबवली. पोस्टाचे कर्मचारी थेट घरी येऊन पेन्शन देत असल्याचे पाहून ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ही सेवा यशस्वी करण्यासाठी परेश राऊत, किशोर मढवी, मधुकर पाटील, सो. मीना म्हात्रे, गंगाराम साटीम, महेंद हुमणे, किशोर नाखवा, सुग्रीव टोगरे, इस्माईल हमदुले, गणपत ढोले, योगेश मते आदी मेहनत घेत आहेत.

आतापर्यंत 25.12 लाखांचे वाटप
अलिबाग, पेण, पोयनाड, कुरूळ, आवास, रोहा या भागांत 141 निवृत्तीधारकांना याचा लाभ देताना आतापर्यंत 25 लाख 11 हजार 900 रक्कमेचे वाटप केले गेले आहे. या योजनेची अंमलबजावणी रायगड डाक विभागामार्फत प्रथमच करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या ठिकाणी सेवा नाही
ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव आहे, अशी ठिकाणे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी या घरपोच सेवेतून वगळल्याची माहिती तक्रार निवारण अधिकारी हनुमंत चीर्मे यांनी दिली आहे. या संकटकाळात या विभागातील कर्मचाऱ्यांनी निवृतीधारकांची घरपोच आर्थिकपूर्ती करताना “कोरोना योद्धा” ही बिरुदावली सार्थ ठरवल्याबद्दल सर्वांचे साहाय्यक अधिक्षक सुनील पवार यांनी आभार मानले आहे.

अलिबागमधील ९६ वर्षांचे आजोबा आणि आवास येथील ८६ वर्षाच्या आजीला घरपोच निवृत्तीवेतन दिल्यानंतर मिळालेल्या आशीर्वादाचे मोल लाख मोलाचे आहे. पेन्शन घेऊन पोस्टमन घरी आल्याचे पाहून त्यांना झालेला आनंद खूप मोठा होता. 
- अनुराधा पेणकर, पोस्ट मास्टर, अलिबाग


ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन ही आर्थिक आधारापेक्षा भावनिक आधार देणारी असते. कोरोनामुळे त्यांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने पोस्टाने त्यांना घरपोच पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. सध्या टेलिकॉम, रेल्वे, पोस्टाचे निवृत्त कर्मचारी यांना ती पोच केली जात आहे. इतर विभागांशी चर्चा सुरु आहे.
- उमेश जनवाडे, अधिक्षक, डाक विभाग, रायगड


सध्याच्या कठिण परिस्थितीतही पोस्टाचे कर्मचारी अविरत सेवा देत आहेत, हे कौतूकास्पद आहे. लहानपणापासून पोस्टाशी   आमचे भावनिक नाते राहिलेले आहे. हीच विश्वासार्हता या कर्मचाऱ्यांनी महामारीतही जपली आहे.
-विठ्ठल हातणकर, निवृत्ती वेतनधारक, अलिबाग

postman came home pensioner emotional

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com